
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा तुळजापूर येथे उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
हवामान बदल,वाढता उत्पादन खर्च आणि बदलती बाजारपेठ या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.आधुनिक शेती तंत्रज्ञान,पीक व्यवस्थापन,सेंद्रिय शेती,प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेतील संधी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,टाटा इन्स्टिट्यूटचे संचालक बाळ राक्षसे,उपजिल्हाधिकारी सागर नन्नावरे,तहसीलदारबोलंगे आत्माचे प्रकल्प संचालक मिसाळ,उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवात एकूण ७५ स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यात शासकीय,निमशासकीय विभाग, महिला बचत गट तसेच विविध संस्थांचा सहभाग आहे.३० शासकीय दालनांमधून कृषी, महसूल,पशुसंवर्धन,जलसंधारण तसेच महिला व बालकल्याण विभागांच्या योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.ड्रोन तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला .सोयाबीन,हरभरा,ऊस,रेशीम आणि आंबा यांसारख्या पिकांच्या लागवडीपासून प्रक्रिया व निर्यातीपर्यंत तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे.‘उत्पादक ते ग्राहक’ या संकल्पनेतून थेट विक्री दालनांमुळे शेतकऱ्यांना मध्यस्थांशिवाय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी महोत्सव परिसराची पाहणी करून विविध स्टॉल्सना भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती व कृषी पर्यटनाबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १८ शेतकरी व शेतकरी गटांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५० कृषी यंत्रांचे प्रातिनिधिक वितरण करण्यात येणार आहे. महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला गेला.
----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis