
रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) :जिल्ह्यातील लघुउद्योग नोंदणी झालेल्या उद्योग घटकांकडून उत्कृष्ट लघुउद्योजकास 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत लघु उद्योग घटकांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व लघु उद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी पात्र लघु उद्योगांना जिल्हा पुरस्कार देण्याची योजना राबविण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना त्या त्या जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत राबविण्यात येते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी लघु उद्योगांची नोंदणी प्रमाणपत्र/उद्यम प्रमाणपत्र आवश्यक, मागील तीन वर्षांत सलग उत्पादन व किमान निव्वळ नफा करत असणारे लघुउद्योग, उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, यापूर्वी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय किंवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा. या अटींची पूर्तता करणारे लघुउद्योग योजनेत भाग घेण्यासाठी पात्र असतील. तसेच विहित नमुन्यात पात्र घटकाकडून मागील ३ वर्षांची वर्षानिहाय माहिती अपेक्षित राहील.
हे पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षात दोन पात्र उद्योग घटकांना देण्यात येतात. प्रथम पुरस्कारास रुपये १५ हजार, तर द्वितीय पुरस्कार रुपये १० हजार रोख, गौरव चिन्ह व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पात्र उद्योग घटकाने विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रासह ४ मार्च २०२६ पूर्वी जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी (औद्योगिक विकास महामंडळ, एमआयडीसी इमारत), जे.के. फाइल्स, बँक ऑफ इंडियाच्या शेजारी) या कार्यालयास सादर करावे. विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अ. अ. आजगेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी