
पुणे, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) योजनांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. महिला व 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी तिकीट सवलत आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) शिवाय मिळणार नाही. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी तातडीने एनसीएमसी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन बारामती आगाराचे प्रमुख रविराज घोगरे यांनी केले आहे.डिजिटल व्यवहाराला चालना देत सवलतींची अचूक नोंद ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
बारामती आगारात एनसीएमसी कार्ड वितरणास सुरुवात झाली. यापूर्वी आधार कार्ड किंवा जन्मतारखेचा पुरावा दाखवून सवलत दिली जात होती. मात्र, नव्या नियमांनुसार ते पुरेसे ठरणार नाही. कार्ड नसल्यास प्रवाशांना पूर्ण तिकीट दर द्यावे लागणार आहे.राज्यात 26 ऑगस्ट 2022 पासून काही प्रवर्गांसाठी मोफत प्रवास योजना सुरू झाली. त्यानंतर 17 मार्च 2023पासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत लागू करण्यात आली. ग््राामीण व शहरी भागातील लाखो महिलांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या योजनांचा लाभ घेतला. मात्र, सवलतींची अचूक आकडेवारी, महसुलातील तफावत आणि शासनाकडून मिळणाऱ्या परतफेडीतील विलंब लक्षात घेता डिजिटल प्रणालीची गरज निर्माण झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु