
परभणी, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। परभणी येथील पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल येथे जिल्ह्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक ऑटिझम आणि बाल विकास विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात लहान मुलांच्या भाषा विकास, बोलण्यातील अडचणी, संवाद समस्या, उच्चारातील त्रुटी, तोतरेपणा तसेच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर संदर्भातील तपासणी, मूल्यमापन व व्यावसायिक मार्गदर्शन पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
या विभागाच्या स्थापनेमुळे परभणी व परिसरातील पालकांना उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाची आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.
स्पीच थेरपी म्हणजे काय? स्पीच थेरपी ही बोलणे, भाषा, आवाज व संवादाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठीची वैज्ञानिक उपचारपद्धती आहे. तज्ज्ञ स्पीच थेरपिस्ट मुलांचे सविस्तर मूल्यमापन करून वैयक्तिक उपचार योजना तयार करतात. यामुळे उच्चार स्पष्ट होणे, संवादकौशल्य वाढणे आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होते.कोणाला या सुविधेची गरज?- उशिरा बोलायला लागणारी मुले,उच्चारातील त्रुटी (उदा. ‘र’ ऐवजी ‘ल’ म्हणणे), तोतरेपणा, ऑटिझममुळे सामाजिक व संवादातील अडचणी, ब्रेन स्ट्रोक, अपघातानंतर भाषा प्रभावित होणे, ओठ-टाळू फाटलेल्या मुलांमध्ये उच्चार समस्या, शालेय वयातील वाचन-लेखन व समज क्षमतेतील अडचणी, लवकर उपचाराचे महत्त्व ० ते ६ वर्षे हा भाषा विकासाचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला जातो. या काळात लवकर तपासणी व उपचार केल्यास सुधारणा अधिक प्रभावी होते, शैक्षणिक अडथळे टाळता येतात आणि मुलांचा सामाजिक व भावनिक विकास सुलभ होतो.या विभागातील तपासणी व मार्गदर्शनाची जबाबदारी रजत सारडा (MACP, PGDEI, ICPEM) यांच्याकडे असून त्यांना हैदराबाद येथील नामांकित संस्थेचा सात वर्षांचा अनुभव आहे.परभणी व परिसरातील पालकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील तसेच हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis