
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। परभणीत जमीन मोजणीवेळी महिला आणि शेतकऱ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ आज आंबेजोगाईत शक्तीपीठ बाधित शेतकरी कृती समितीने तीव्र निदर्शने केली. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि सक्तीची जमीन मोजणी थांबवावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
बीड जिल्हा किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात वरवटी, भारज, सायगावसह अनेक गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. महिलांना झालेली धक्काबुक्की आणि प्रशासकीय दडपशाहीचा निषेध करत, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन संपादन करू नये, असा इशारा यावेळी देण्यात आला. शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, असे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून हा प्रकल्प रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis