
रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना ढालघर फाटा येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली येथील असून ते त्यांच्या ताब्यातील आयशर 3018 टेम्पो (क्र. एमएच 10 डीटी 8327) हा सांगली ते अलिबाग असा मुंबई-गोवा महामार्गावरून माणगावच्या दिशेने चालवीत होते. अपघातस्थळी पोहोचताच समोरून येणारी मारुती सुझुकी वॅगनर (क्र. एमएच 04 एचएफ 5613) ही कार अचानक रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आली.
सदर कार चालक (रा. ठाणे) याने वाहन अविचाराने, हयगयीने व बेदरकारपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने कार थेट टेम्पोवर आदळली. या धडकेत कारमधील चालकासह अन्य दोन प्रवाशांना किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 53/2026 अन्वये मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 तसेच भा.न्या.स. कलम 281, 125 (अ), 125 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ/निमकर करीत आहेत.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वेगमर्यादा व सुरक्षित वाहनचालना याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून दक्षतेने वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके