
लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
लातूर शहरातील एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी केलेला सक्षम तपास, पुरावे संकलन तसेच न्यायालयीन प्रक्रियेत केलेली प्रभावी पैरवी यामुळे पीडितेला न्याय मिळण्यास मदत झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा क्रमांक 360/2022 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 376, 376(3), 376(2), 354(अ)(1), 354(ब) तसेच पोस्को कायदा कलम 4, 6, 8, 12 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात महिला फिर्यादीने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, आरोपी संजय गोविंदराव कोळी (वय 46 वर्षे, रा. विक्रम नगर, लातूर) याने फिर्यादीच्या पीडित मुलीशी गैरवर्तन व लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एम.आय.डी.सी. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली व पुढील तपास सुरू केला.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गिते यांनी अत्यंत बारकाईने व कायदेशीर बाबींची पूर्तता करून केला. तपासादरम्यान पीडितेचे जबाब, वैद्यकीय अहवाल, पंचनामे तसेच इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयीन कामकाजादरम्यान पोलिसांनी सरकारी पक्षाला आवश्यक ते सर्व सहकार्य केले.
सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. एस. व्ही. जाधव, सत्र न्यायाधीश-४ तथा विशेष न्यायालय, लातूर यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्री. एम. एस. महिंद्रकर यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. तसेच पैरवी महिला पोलीस अंमलदार बी. टी. हिंगडे यांनी खटल्याच्या कामकाजात समन्वय ठेवून महत्वाची भूमिका बजावली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे विचारात घेऊन मा. न्यायालयाने आरोपी संजय गोविंदराव कोळी यास दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 354(अ) तसेच पोस्को कायदा कलम 8 अन्वये ३ वर्षे कारावास व रुपये ४,०००/- दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक एस. के. चवरे यांच्या देखरेखित संपूर्ण तपास व न्यायालयीन प्रक्रिया पार पडली. तसेच टी.एम.सी. सेलचे सपोनि शिवशंकर मनाळे यांनीही समन्वय साधण्यात सहकार्य केले.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून महिलांवर व अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जाते. अशा गुन्ह्यांमध्ये तात्काळ कारवाई करून आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्याबाबत पोलीस दल कटिबद्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis