पालघर - उन्हाचा तडाखा वाढला; नागरिकांची थंड पेयांकडे धाव
पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी काहीसे आल्हाददायक वातावरण असले, तरी दुपारी १२ नंतर उन्हाची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढत आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमाल तापमान २६
उन्हाचा तडाखा वाढला; नागरिकांची थंड पेयांकडे धाव, दुपारची वर्दळ घटली


पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी काहीसे आल्हाददायक वातावरण असले, तरी दुपारी १२ नंतर उन्हाची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढत आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने दुचाकीस्वार, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र दिसून आले.

उन्हाच्या झळांपासून बचावासाठी अनेक नागरिक रूमाल, टोपी, स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत. दुपारच्या कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळही घटली असून, नागरिक अनावश्यक बाहेर पडणे टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर शीतपेयांच्या दुकानांपुढे मात्र ग्राहकांच्या रांगा लागत असल्याचे दिसून आले. लिंबूपाणी, उसाचा रस, थंड पेये तसेच आईस्क्रीम विक्रेत्यांकडे मोठी गर्दी होत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, मार्चपूर्वीच उन्हाची तीव्रता वाढल्याने यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारच्या कडक उन्हाचा सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्रातील मजूर, हातगाडीवाले आणि छोटे विक्रेते यांना बसत आहे. कामाचा वेग मंदावल्याने रोजंदारीवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सुमारास बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा तसेच उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande