
नाशिक, 25 फेब्रुवारी (हिं.स.) हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ या कालावधीत खारघर (नवी मुंबई) येथे कार्यक्रम होत आहे. या सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासाचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर (नवी मुंबई) येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी सोहळा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृहात आज सकाळी नियोजन व समन्वय साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, सहायक परिवहन अधिकारी सचिन बोधले, समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, खारघर येथे अतिशय महत्वपूर्ण सोहळा होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक रवाना होणार आहेत. भाविकांच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक बसमध्ये पाणी, अन्नाची पाकिटे, आरोग्य सेवक, संपर्क अधिकारी राहील याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. नाशिकमार्गे धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील भाविक रवाना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर मालेगाव, इगतपुरी येथे आरोग्य पथके कार्यान्वित ठेवावीत. पोलीस दल, परिवहन अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी करावी. आवश्यक तेथे आरोग्य पथके तैनात ठेवावीत. अन्न व औषध प्रशासनानेही आपले कर्मचारी नियुक्त करावेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानेही यावेळी सतर्क रहावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी सांगितले की, हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या शहीदी समागमाचा सोहळा देशपातळीवरील सोहळा आहे. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील शीख, लबाण बंजारा, शिकलगरसह नऊ समाजातील भाविक रवाना होणार आहेत. त्यासाठी वेळोवेळी आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमांची माहिती सर्व विभागांनी अद्ययावत करावी. नियोजित ठिकाणी बस वेळेत पोहोचतील याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. त्यासाठी समन्वय ठेवावा. आवश्यकतेनुसार नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. तेथे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत. चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV