
नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।नांदेड येथील तरोडा बुद्रुक परिसरातील नागेश कॉम्प्लेक्समध्ये असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी पिकअपसारख्या वाहनातून उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या एटीएममध्ये अंदाजे ६ लाख ७३ हजार ५०० रुपये इतकी रोकड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार आरोपी नागेश कॉम्प्लेक्स येथे आले. त्यांनी एटीएम मशीन संपूर्णपणे उचलून वाहनात टाकले आणि घटनास्थळावरून पसार झाले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. संबंधित बँकेलाही घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या सूचनेनुसार भाग्यनगर पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांच्या एकूण सहा पथकांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, वाहनांची नाकाबंदी तसेच संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis