
परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
कर्मचारी गौरव उपक्रमांतर्गत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील तीन कर्मचार्यांना जानेवारी 2026 महिन्यासाठी महाव्यवस्थापक स्तरावरील ‘एम्प्लॉई ऑफ द मंथ’ (महिन्यातील सर्वोत्तम कर्मचारी) सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोमवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद येथे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले तसेच नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि झोनमधील इतर विभागप्रमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदविला. पुरस्कार प्राप्त कर्मचार्यांमध्ये बोल्डा येथील पॉइंट्समन दिलराज मीणा, ट्रॅक मेंटेनर-III इंगोले अमोल आणि बसमत येथील ट्रॅक मेंटेनर-II सुरेश मस्के यांचा समावेश आहे. या तिघांनी दक्षता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर संभाव्य मोठ्या दुर्घटना टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दि. 20 जानेवारी 2026 रोजी बोल्डा स्थानकावर गाडी क्रमांक 17642 एक्सप्रेस सुटण्याच्या प्रतीक्षेत असताना दिलराज मीणा यांनी कोच बी-2 जवळील भाग लोंबकळताना पाहिला. तपासणीत आर्म बॉटम कव्हरचे बोल्ट निघाल्याने पुढील ट्रॉली लोंबकळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या सतर्कतेमुळे तात्काळ दुरुस्ती करण्यात येऊन संभाव्य गंभीर अपघात टळला.दि. 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता बसमत-माळसेलू दरम्यान सुरेश मस्के यांनी एफबी वेल्ड फेल्युअर शोधून काढले. त्यांनी तत्काळ लाकडी ब्लॉक देऊन ट्रॅकचे संरक्षण केले व सैल फिटिंग घट्ट केली. त्यांच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा सुरक्षाधोका टळला. तर दि. 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता बोल्डा-सिरली दरम्यान ओएचई पोल क्रमांक 901/15-16 जवळ इंगोले अमोल यांनी एफबी वेल्ड फेल्युअर ओळखून तात्काळ लाकडी ब्लॉक देणे, सैल फिटिंग घट्ट करणे व आपत्कालीन क्लॅम्प बसविणे अशा उपाययोजना केल्या. अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत संभाव्य मोठी दुर्घटना टाळली. महाव्यवस्थापकांनी पुरस्कार विजेत्यांच्या समर्पण, दक्षता व व्यावसायिक बांधिलकीचे कौतुक करत अशा कृतीमुळे दक्षिण मध्य रेल्वेमधील सुरक्षा संस्कृती अधिक बळकट होत असल्याचे नमूद केले. या सन्मानामुळे इतर कर्मचार्यांनाही सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis