युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलने मुंबईत पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसची केली घोषणा
मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलने भारतात आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसची घोषणा करत मुंबईत ‘मुंबई एंटरप्राइझ कॅम्पस’ सुरू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या उपक्रमातून जागतिक दर्जाचे संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्
University of Bristol


मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलने भारतात आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसची घोषणा करत मुंबईत ‘मुंबई एंटरप्राइझ कॅम्पस’ सुरू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या उपक्रमातून जागतिक दर्जाचे संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्याचा उद्देश आहे. पवई येथील ‘इनोव्हेशन हब’मध्ये ऑगस्ट २०२६ पासून कॅम्पस सुरू होणार असून पहिल्या बॅचमध्ये २५० विद्यार्थ्यांचा समावेश असेल. विद्यापीठाच्या १५० व्या वर्षात उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

या निमित्ताने विद्यापीठाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सोबत जागतिक धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात संशोधन, उद्योग-केंद्रित शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी करिअर संधी निर्माण करणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना जागतिक स्तरावरील आव्हानांसाठी तयार केले जाणार आहे.

ब्रिस्टलला ‘एआय युनिव्हर्सिटी ऑफ द इयर २०२४’ हा सन्मान मिळाला असून येथे ‘Isambard-AI’ हा जगातील वेगवान युनिव्हर्सिटी सुपरकॉम्प्युटर कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर टीसीएससोबतचे सहकार्य एआय संशोधनाला नवी दिशा देणार आहे. टीसीएस एज्युकेशनचे ग्लोबल हेड वेंगूस्वामी रामास्वामी यांनी ही भागीदारी भविष्य बदलणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

याशिवायआयआयटी बॉम्बे, आयसीआयसीआय बँक, सुपरव्हिटी एआय, ब्रिटिश कौन्सिल आणि शांता फाउंडेशन यांच्यासोबतही सहकार्य जाहीर करण्यात आले आहे. शांता फाउंडेशनकडून £१५ लाखांचा रिसर्च आणि मोबिलिटी फंड देण्यात आला असून यामुळे भारत-यूके दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक देवाणघेवाणीला बळ मिळणार आहे.

व्हाईस चान्सलर प्रोफेसर एवलिन वेल्च यांनी मुंबई कॅम्पस हे जागतिक दर्जाचे संशोधन, उत्कृष्ट शिक्षण आणि उद्योग सहकार्य यांचे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईत उभारला जाणारा हा कॅम्पस भारत-यूके शैक्षणिक संबंधांना नवी उंची देणारा ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande