रत्नागिरीत शनिवारी विकास कशाळकर गुरुऋण कार्यक्रम
रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : पंडित विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांनी रचलेल्या बंदिशींचा शास्त्रीय संगीताचा गुरुऋण हा कार्यक्रम येत्या शनिवारी, दि. २८ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत होणार आहे. ओंकार आदिनाद फाउंडेशन प्रस्तुत मु
गुरुऋण कार्यक्रम


रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : पंडित विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांनी रचलेल्या बंदिशींचा शास्त्रीय संगीताचा गुरुऋण हा कार्यक्रम येत्या शनिवारी, दि. २८ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत होणार आहे.

ओंकार आदिनाद फाउंडेशन प्रस्तुत मुग्धनाद-रत्नागिरी आणि रघुकुल स्वरविहार-सावंतवाडी यांच्यातर्फे गुरूऋण कार्यक्रम आयोजित केला आहे. गुरु पंडित विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून त्यांचे भारतातील तसेच परदेशात असलेले सर्व शिष्य आपापल्या गावी त्यांनी रचनाबद्ध केलेल्या बंदिशी गाऊन त्यांच्याविषयीचा आदर व श्रद्धा व्यक्त करणार आहेत. पंडित विकास कशाळकर यांनी अनेक परिचित व अपरिचित रागात सुमारे 200 बंदिशी बांधल्या आहेत. एक उत्तम गुरू, संगीतज्ज्ञ, रिसर्च गाइड, संगीतातील अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण भाषण करणारे वक्ते, ऊस डोंगा परी व निर्धार या संगीत नाटकचे लेखक, संगीतकार, ग्वाल्हेर आग्रा व जयपूर गायकीचे अभ्यासक आहेत.

त्यांच्या अमृतमहोत्सवी सांगीतिक वाटचालीचे औचित्य साधून या कार्यक्रम सादर होणार आहे. सर्व रसिक श्रोत्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा व कलाकारांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सौ मुग्धा भट सामंत, प्रसाद भाटवडेकर, सौ. नूतन परब तेजम, सौ. मनाली दाणी बर्वे सादर करणार असून त्यांना तबलासाथ हेरंब जोगळेकर आणि हार्मोनियमसाथ श्रीरंग जोगळेकर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. अंजली दाणी करणार आहेत.

रत्नागिरीत गोदूताई जांभेकर विद्यालयात शनिवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत होणार असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande