
लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)देवणी तालुक्यातील तळेगाव येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेवर लाथाबुक्क्यांनी, काठी व दाव्याने हल्ला केल्याची घटना घडली असून याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात तळेगाव येथील चार जणांविरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निता ज्ञानेश्वर कांबळे (वय ३०) रा. तळेगाव, ता. देवणी, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.१७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तळेगाव येथील त्यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. तू लेकराला का मारलेस या शूल्लक कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत वाद घातला. आरोपी क्र १ पांडुरंग तुळशीराम कांबळे (सासरा) व आरोपी क्र. २ रुपेश बालाजी कांबळे (भाचा) यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुक्कामार दिला. त्यानंतर आरोपी क्र. ३ सविता बालाजी कांबळे (नणंद) हिने लाकडी काठीने फिर्यादीच्या पाठीवर मारून जखमी केले, तर आरोपी क्र. ४ शाहुबाई बाळू सोनकांबळे (नणंद) हिने दाव्याने मारून दुखापत केली.
यावेळी सर्व आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी सपोंनि भिमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरंनं. ३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार उस्तुर्गे हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis