अवैध सावकारी प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार - पंकज भोयर
मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जाच्या परतफेडीसाठी किडनी काढण्याच्या घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली असून या प्रकरणी कायद्यातील तरतुदी पाहून मोक्का लावण्यासंदर्भात विचार केला जाईल, अशी माहिती गृह (ग्राम
अवैध सावकारी प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार - पंकज भोयर


मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जाच्या परतफेडीसाठी किडनी काढण्याच्या घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली असून या प्रकरणी कायद्यातील तरतुदी पाहून मोक्का लावण्यासंदर्भात विचार केला जाईल, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली. अवैध सावकारीप्रकरणी या कायद्यात आणखी सुधारणा करून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिथूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यात ओढून कंबोडियात नेऊन त्याची किडनी काढल्याप्रकरणी सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर राज्यमंत्री डॉ. भोयर उत्तर देत होत होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, २०२१ ते २०२३ या कालावधीत ही घटना घडली असून २०२५ मध्ये संबंधित शेतकऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण प्रकाशात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील घटनेच्या चौकशीत या प्रकरणातील मध्यस्थाच्या माध्यमातून नऊ जणांच्या किडन्या विकण्यात आल्याचे निदर्शनास आले असून त्यापैकी १ शेतकरी असून दोन जण अवयव दान करणारे आहेत. पोलिसांनी सखोल तपास करत सहा आरोपींना सुरुवातीला अटक केली. हे आरोपी शेतकऱ्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करत असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात सोलापूरमध्ये राहणारा एक इसम या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आले. या प्रकरणात संबंधित इसमासह त्याला मदत करणाऱ्या आणखी एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक झाली आहे. तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली. अशा प्रकारचे अवैध अवयव विक्रीचे व्यवहार भारतातही सुरू असल्याचे निष्पन्न झाले. तामिळनाडूमधील त्रिची येथील एका रुग्णालयात किडनी विक्रीचा प्रयत्न झाल्याचे आढळले. या प्रकरणी रुग्णालयाच्या मालकाविरुद्ध आणि दिल्लीहून येणाऱ्या एका डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, असेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी सांगितले.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आरोपींची संपत्ती गोठविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यात सावकारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधिक्षक, उपनिबंधक यांची समिती कार्यरत आहे. परवानाधारक सावकारांकडील डाटा दर तीन महिन्यात या समितीकडे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. किती दराने कर्ज वाटप केले जावे याचे नियम आहेत. परवानाधारक सावकार किती व्याज दराने कर्ज देतात याचा डाटा समितीकडे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सावकारी व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला तक्रारी मिळाल्यास तत्काळ पथक स्थापन करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील ही घटना दुर्देवी असून दोषींवर कारवाई करण्यात येईल. संबंधित डॉक्टरवरही नक्कीच ठोस कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणी कायदे आणखी कठोर करण्यात येतील. या प्रकरणातील उपनिबंधकाची संपूर्ण चौकशी करून दोषी आढळल्यास बदली व निलंबन केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. परभणी मधील शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी चौकशी केली जाईल, असेही त्यांनी यावेळी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या चर्चेत सदस्य विजय वडेट्टीवार, अर्जून खोतकर, योगेश सागर, रणधीर सावरकर, नितीन राऊत, आदींनी सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande