
मुंबई, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। आयकूने आपल्या फ्लॅगशिप मालिकेत नवीन iQOO 15R भारतात लाँच केला असून याची सुरुवातीची किंमत 44,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यापूर्वी कंपनीने iQOO 15 सादर केला होता आणि आता त्याच मालिकेत हा नवा स्मार्टफोन आणण्यात आला आहे. मोठी बॅटरी, फ्लॅगशिप प्रोसेसर, उच्च दर्जाचा डिस्प्ले आणि दमदार कॅमेरा सेटअप यामुळे हा फोन ऑन-पेपर प्रभावी ठरत आहे.
या फोनमध्ये 6.59 इंचाची 1.5K रिझोल्यूशन (1260 x 2750 पिक्सेल्स) असलेली AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 5000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 4320Hz PWM डिमिंग सपोर्टमुळे गेमिंग आणि व्हिडिओ अनुभव अधिक स्मूथ होतो. HDR10+ सर्टिफिकेशनमुळे रंगांची गुणवत्ता अधिक उठावदार दिसते. प्रोसेसर म्हणून Snapdragon 8 Gen 5 चिपसेट देण्यात आला असून कंपनीच्या दाव्यानुसार याचा AnTuTu स्कोअर 35 लाखांपेक्षा जास्त आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 826 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे.
कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, मागील बाजूस 50MP Sony LYT-700V प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्यासोबत 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे 7,600mAh ची बॅटरी. ती 100W फास्ट चार्जिंगसह येते आणि बायपास चार्जिंग सपोर्टही उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 7, Bluetooth 6, GPS आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. IP68 आणि IP69 रेटिंगमुळे पाणी व धुळीपासून संरक्षण मिळते.
हा फोन डार्क नाइट आणि ट्रिंफ सिल्वर रंगांत उपलब्ध असून प्री-बुकिंग सुरू झाली आहे. विक्री 3 मार्चपासून सुरू होणार आहे. बँक ऑफरअंतर्गत 4,000 रुपयांपर्यंत सूट आणि TWS इयरबड्स मोफत दिले जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule