जंगलांमधील आगीच्या घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध करुन देणार - वनमंत्री
मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। राज्यातील वन क्षेत्रात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी व आग विझविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, एनजीओ, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सतत कार्यरत आहेत. सॅटॅलाइट प्रणालीच्या माध्यमातून वणवे ओळखण्याची यंत्रणा कार्
जंगलांमधील आगीच्या घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध करुन देणार - वनमंत्री


मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। राज्यातील वन क्षेत्रात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी व आग विझविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, एनजीओ, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सतत कार्यरत आहेत. सॅटॅलाइट प्रणालीच्या माध्यमातून वणवे ओळखण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

राज्यातील विशेषतः बीड, सोलापूर व ठाणे जिल्ह्यांमध्ये लागलेल्या जंगलातील आगीबाबत विधानसभेत सदस्य ज्योती गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर वनमंत्री नाईक यांनी उत्तर दिले.

वनमंत्री नाईक यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यात 204, सोलापूरमध्ये 36 आणि बीड जिल्ह्यात 25 ठिकाणी वणवे लागल्याची नोंद झाली आहे. या आगी विझवण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांचाही सहभाग घेतला जात आहे. वनरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटक पुढे येत आहे. तसेच वन कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थीही काही ठिकाणी मदत करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात वनक्षेत्र असून रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 90 टक्के जागा खाजगी मालकीची आहे. खाजगी जमिनीवरील झाडांना आग लागल्यामुळे फणस, आंबा, नारळ, पोपळी यांसारख्या झाडांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने हा विषय मार्गी लावण्यात येईल.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील एकवीरा वनक्षेत्रात लागलेली आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असून फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे आग तात्काळ विझवली गेली. पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी एमएसईबीला जुन्या वायर बदलण्याच्या सूचना दिल्या जातील. देवीच्या मंदिर परिसरात स्वच्छता करून आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असेही वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य सर्वश्री संजय मेश्राम, शेखर निकम, बाबासाहेब देशमुख यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande