
मुंबई, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। : कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच फ्लाय अॅशसंदर्भात धोरण अस्तित्वात असून शहरातील डेब्रिजवर प्रक्रिया करून तयार होणारी अॅश बांधकामात पुनर्वापर होऊ शकते, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.
विधान परिषद सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी राज्यातील हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अमित गोरखे यांनी सहभाग घेतला.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना सांगितले, राज्यात हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी केंद्राची यंत्रणा कार्यरत आहे. यामधून तेथील परिसराचे मॉनिटरिंग केले जाते. ‘समीर’ अॅपच्या माध्यमातून दररोजची हवेची गुणवत्ता नागरिकांना पाहता येते.
मुंबईसह अन्य मोठ्या शहरात सुरू असलेल्या बांधकामामुळे धूळ व ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पाहणीसाठी पाठविण्यात येईल. तसेच सदस्यांकडून विशिष्ट स्वरूपाची तक्रार मिळाल्यास त्यावरही तत्काळ कारवाई केली जाईल, असेही पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
वायू प्रदूषण नियंत्रण व प्रदूषणकारी घटकांचा अटकाव करण्यासाठी मुंबई वायू शमन प्रभावी योजना 2023 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात बांधकामावरील नियंत्रणासाठी 28 मुद्द्यांची सर्वंकष मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात आली आहेत. या नियमांची काटेकोर पालन न करणारी बांधकामे बंद करण्याचे आदेश दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर