पी.एम. किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू - कृषी मंत्री
मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांचा समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे पाठपुरावा करत आहे असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. प्रधा
पी.एम. किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू - कृषी मंत्री


मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांचा समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे पाठपुरावा करत आहे असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांमध्ये राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी लाभापासून वंचित असल्यासंदर्भात आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या २१ जून २०१९ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०१९ पासून राज्यात योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी रु. २,००० प्रमाणे वर्षातून तीन हप्त्यांत एकूण रु. ६,००० थेट लाभ हस्तांतरण (डिबीटी) पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

केंद्र शासनाच्या २१ जून २०१९ च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार लाभार्थी पात्रता निश्चित करण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ ही अंतिम (कट-ऑफ) तारीख निश्चित करण्यात आली आहे. यानंतर ज्या शेतक-यांनी नवीन जमीन घेतली तर तो लाभार्थी ठरत नाही. २०१९ नंतर खरेदीखत, वाटणीपत्र देणगीपत्र इत्यादी सारख्या कराराद्वारे लागवडयोग्य जमिनीचे दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण झाल्यास, ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरित झाली आहे. ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरत नाही; कारण दि.१ फेब्रुवारी २०१९ रोजी अशी व्यक्ती जमिनीची मालक नव्हती. तसेच, जमीन हस्तांतरित करणारी मूळ व्यक्ती (जमीन मालक) देखील या योजनेसाठी अपात्र ठरते. म्हणजेच १ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन खरेदी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ देता येत नाही. तसेच ज्यांनी आपली सर्व जमीन विकली किंवा हस्तांतरित केली आहे, अशा व्यक्ती देखील योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतात. या निकषांमध्ये बदल करावा म्हणून प्रयत्न करत आहे असे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील ६,९९,५८८ अर्जदार शेतकऱ्यांपैकी ६,८२,१४१ पात्र लाभार्थ्यांना एकूण रु. २,१८५.६४ कोटी रक्कम २२ हप्त्यांत थेट खात्यावर वितरित करण्यात आली आहे. तसेच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ५ लाख पात्र लाभार्थ्यांना ७ हप्त्यांत एकूण रु. ७,०५५.४९ कोटी देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री भरणे यांनी पुढे सांगितले की, पी.एम. किसान योजनेचा २१ वा हप्ता दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी कोईम्बतूर (तामिळनाडू) येथून वितरित करण्यात आला असून राज्यातील ९०.७४ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर रु. १,८१४.७४ कोटी जमा झाले आहेत. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीचा ७ वा हप्ता दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील ४,९५,०९० लाभार्थ्यांना रु. १,०२२.२८ कोटी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वितरित करण्यात आला.

यामुळे पी.एम. किसान योजनेत समावेश हा केंद्र शासनाच्या विद्यमान निकषांनुसारच करण्यात येत असून, पात्रतेबाबतचे निर्णय केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच घेतले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande