
कोल्हापूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
फुलेवाडी येथील रिंगरोड परिसरातील फ्रेंडशिप फिश कंपनीवर छापा टाकून अनूसुचित वन्यजीव प्रकारातील मृत ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ (Mobula kuhlii) हा मासा जप्त केला. संबंधित मासा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती.
या प्रकरणी सुनील विनोद सातपुते (रा. पेडेयच्चीड, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मासा ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार करवीर वनपरिक्षेत्रात दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी कारवाई केली.
ही कारवाई उपवनसंरक्षक, कोल्हापूर चैत्रिशाल पाटील तसेच सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी करवीर नंदकुमार नलवडे, वनपाल सागर कोळी, वनरक्षक ओंकार भोसले, विकास घोलप, महादेव कुंभार, विदेश तांबारे, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर आणि मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अनूसुचित वन्यजीवांची खरेदी-विक्री अथवा साठा आढळल्यास तात्काळ वन्यजीव कार्यालयाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar