
लंडन, २५ फेब्रुवारी (हिं.स.)द हंड्रेड स्पर्धेसाठी निवड प्रक्रियेत पाकिस्तानी क्रिकेटपटूंना कोणताही भेदभाव सहन करावा लागणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) हे स्पष्ट केले. राजकीय तणावामुळे काही भारतीय मालकीच्या फ्रँचायझी पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडे दुर्लक्ष करणार असल्याची चर्चा होती.
आठ संघांच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चार भारतीय मालकीच्या फ्रँचायझी - मँचेस्टर सुपर जायंट्स, एमआय लंडन, सदर्न ब्रेव्ह आणि सनरायझर्स लीड्स - पुढील महिन्याच्या लिलावात पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा विचार करत नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. द हंड्रेडच्या आगामी हंगामासाठी निवडीसाठी एकूण ६७ पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी (६३ पुरुष आणि ४ महिला) नोंदणी केली आहे.
ईसीबीने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि द हंड्रेडच्या सर्व आठ फ्रँचायझी पुन्हा एकदा पुष्टी करतात की ही स्पर्धा समावेशक, स्वागतार्ह आणि सर्वांसाठी खुली असेल. सर्व संघ केवळ क्रिकेट कामगिरी, उपलब्धता आणि संघाच्या गरजांवर आधारित निवड करतील.
२००९ पासून पाकिस्तानी क्रिकेटपटू राजनैतिक तणावामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. आता आयपीएल मालकांकडे विविध देशांमधील लीगमध्ये संघ आहेत, त्यामुळे इतर स्पर्धांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना मिळणाऱ्या संधी मर्यादित होण्याची भीती होती. द हंड्रेड लिलाव ११ आणि १२ मार्च रोजी लंडनमध्ये होणार आहे.
या अफवांनंतर इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन ईसीबीच्या हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्यांमध्ये होता. वॉन म्हणाला, लीग त्यांच्याकडे आहे आणि हे होऊ देऊ नये. जर क्रिकेट हा देशातील सर्वात समावेशक खेळ असेल तर अशी परिस्थिती स्वीकारार्ह असू शकत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे