तीन दिवसाच्या दरवाढीनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण
जळगाव, 26 फेब्रुवारी, (हिं.स.) जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तीन दिवस दरवाढ झाल्यानंतर गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आज
सोनं


जळगाव, 26 फेब्रुवारी, (हिं.स.) जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तीन दिवस दरवाढ झाल्यानंतर गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आज दर कमी झाल्याने खरेदीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५१५ रुपयांची घट झाली. त्यामुळे जीएसटीसह प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ६४ हजार ०७९ रुपयांवर आला आहे. यापूर्वी सोमवारी १,४४२ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर मंगळवारी ७२१ रुपयांची आणि बुधवारी आणखी ३०९ रुपयांची वाढ नोंदवली गेली होती.

सलग वाढीनंतर सोन्याचा दर १ लाख ६४ हजार ५९४ रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे आज झालेली घसरण ही ग्राहकांसाठी काहीशी समाधानकारक मानली जात आहे. चांदीच्या दरातही लक्षणीय घसरण झाली आहे. गुरुवारी सकाळी बाजार उघडताच चांदीच्या दरात ३,०९० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे जीएसटीसह प्रति किलो चांदीचा दर २ लाख ७८ हजार १०० रुपयांवर आला आहे. यापूर्वी सोमवारी तब्बल ११ हजार ३३० रुपयांची वाढ झाली होती. मंगळवारी १,०३० रुपयांची आणि बुधवारी दिवसभरात पुन्हा १,०३० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे चांदीचा दर २ लाख ८१ हजार १९० रुपयांपर्यंत गेला होता. सलग वाढीनंतर आज झालेली मोठी घसरण ही बाजारासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande