रत्नागिरी : ‘ईठ्ठला’ नाटकावर बंदी घालण्याची मागणी
रत्नागिरी, 26 फेब्रुवारी, (हिं. स.) : वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी लांजा तालुका वारकरी संप्रदायातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वारकरी संप्रदाय, संतपरं
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


रत्नागिरी, 26 फेब्रुवारी, (हिं. स.) : वारकरी संप्रदायाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी लांजा तालुका वारकरी संप्रदायातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वारकरी संप्रदाय, संतपरंपरा आणि भगवान श्री विठ्ठल यांच्यासंदर्भात विकृत व अवमानकारक सादरीकरण करणारे ‘ईठ्ठला’ हे नाटक ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरी सादर करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

रत्नागिरीत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत २५ फेब्रुवारी रोजी स्वा. सावरकर नाट्यगृहात लांजा येथील वीर शैव समाज निर्मित, अमोल रेडीज लिखित आणि दिग्दर्शित ‘ईठ्ठला’ हे नाटक अमोल रंगायत्रीतर्फे सादर करण्यात आले. लांजा व रत्नागिरीतील ३० हून अधिक वारकरी व हिंदुत्वनिष्ठांनी नाटक पाहिले. हे नाटक वारकरी संप्रदायाचे विकृत सादरीकरण करणारे आणि समस्त विठ्ठलभक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे, हे त्यांच्या निदर्शनास आले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून वारकरी संप्रदाय हा अहिंसा, भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आदी वारकरी संप्रदायातील अनेक संतांनी विठ्ठलभक्तीचे मर्म सांगितले आहे. भगवान श्री विठ्ठलाच्या भक्तीमुळे व्यसने सुटल्याचा, सन्मार्गाला लागल्याचा, स्वतःमध्ये आमूलाग्र पालट झाल्याचा अनुभव असंख्य वारकऱ्यांनी घेतला असून अजूनही घेत आहेत आणि यापुढेही घेत राहतील. मात्र 'ईठ्ठला' या नाटकात श्री विठ्ठलाची भक्ती आणि त्याचे नामस्मरण करणारे वारकरी दांपत्य पांडुरंगाच्या नामस्मरणात बेभान होऊन नाचत १० निष्पाप माणसांच्या हत्या करतात, असे दाखवले आहे. हे अविश्वसनीय असून हा एक प्रकारे वारकरी संप्रदाय आणि श्री विठ्ठलभक्तांचा अवमानच आहे. नाटकातील पात्रांना तुका, जना, नामा अशी संतांची नावे देऊन एक प्रकारे वारकरी संतांचा अवमानच केला आहे. लोभापायी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा आशय नाटकातून व्यक्त होत आहे, तर त्याला अनुसरून नाटकाचे नाव न ठेवता 'ईठ्ठला' हे नाव नाटकाला ठेवून श्री विठ्ठलाची विटंबनाच केली आहे.

या नाटकामध्ये वारकरी संप्रदायाच्या श्रद्धांचा उपहास असून विठ्ठल भक्तीविषयी गैरसमज, संशय व साशंकता निर्माण करणारे आणि वारकरी तत्त्वज्ञानाच्या पूर्ण विरोधात हे नाटक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 'ईठ्ठला' या नाटकावर तात्काळ बंदी आणावी. तसेच या नाटकाच्या पुढे होणाऱ्या सर्व प्रयोगांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी. राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत सादर झालेल्या या नाटकास कोणताही क्रमांक, उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात येऊ नये आणि स्पर्धेतून हे नाटक बाद करण्यात यावे. यापुढे कुठेही या नाटकाचे प्रयोग करू नयेत, अशी सक्त ताकीद या नाटकाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्ते यांना देण्यात यावी, अशी मागणीही वारकऱ्यांनी केली आहे.

या गंभीर बाबीची तातडीने दखल शासनाने घ्यावी; अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही वारकरी संप्रदायातर्फे देण्यात आला आहे.

या वेळी हभप मनोहर रणदिवे, तुळशिराम मोरे, विष्णू लांजेकर, दर्शन आग्रे, गोविंद चव्हाण, पांडुरंग शिंदे, मनोहर करंबेळे, किशोर लांजेकर, भिकाजी लांजेकर, हिंदु जनजागृती समितीचे भैरूलाल भंडारी, सकल हिंदू समाजाचे अधिवक्ता रूपेश गांगण, सनातन संस्थेचे विष्णुदास म्हात्रे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे अमितराज खटावकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संजय जोशी आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande