
इस्लामाबाद, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।अफगाणिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने उघड युद्धाची घोषणा केली आहे. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानातील कंदहार आणि काबूलसह अनेक प्रमुख शहरांवर बॉम्बहल्ले केले. सुमारे दोन तास चाललेल्या या हवाई कारवाईत पाकिस्तानने १३३ अफगाण लढवय्ये ठार केल्याचा दावा केला आहे.दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर तालिबानला कठोर इशारा देत त्यांना भारताचा मोहरा असल्याचा आरोप केला.
आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये अफगाणिस्तानला इशारा देताना संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी उघड युद्धाची घोषणा केली. त्यांनी धमकीच्या सुरात म्हटले की, आमच्या संयमाचा अंत झाला आहे. आता तुमच्यात आणि आमच्यात खुले युद्ध सुरू झाले आहे. आता दमा-दम मस्त कलंदर होईल.ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानचे सैन्य समुद्रापारून आलेले नाही. आम्ही तुमचे शेजारी आहोत आणि तुमच्या प्रत्येक लहान-मोठ्या हालचालीची आम्हाला माहिती आहे.
तालिबानविषयी आपल्या पोस्टमध्ये संरक्षणमंत्र्यांनी म्हटले की, नाटो सैन्य माघारी गेल्यानंतर अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होईल आणि तालिबान अफगाण जनतेच्या हितासाठी तसेच प्रादेशिक शांततेसाठी काम करेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी आरोप केला की तालिबानने जगभरातील दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय दिला आणि दहशतवादाचा प्रसार सुरू केला. त्यांनी स्वतःच्या नागरिकांना मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित ठेवले आणि महिलांना इस्लामने दिलेले अधिकार हिरावून घेतले.
पाकिस्तानने काबूल आणि कंदहारसह अफगाणिस्तानातील प्रमुख शहरांवर हवाई हल्ले केले, ज्यामुळे तालिबान सरकारकडून प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू झाली.अफगाण सैन्याने सीमापार पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले केल्याचा दावा केला असून, हे आधीच्या घातक हवाई हल्ल्यांना दिलेले प्रत्युत्तर असल्याचे सांगितले.काबूलने दावा केला की ड्युरंड रेषेजवळ चार तास चाललेल्या कारवाईत ५५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. दोन तळ आणि १९ चौक्यांवर ताबा मिळवण्यात आल्याचेही सांगितले.तालिबान सरकारने म्हटले की, नंगरहारमधील एका निर्वासित छावणीवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आठ अफगाण लढवय्ये ठार झाले आणि ११ जखमी झाले. तसेच १३ नागरिक जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला.
मात्र पाकिस्तानने या आकडेवारीला आक्षेप घेतला. माहितीमंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी केवळ दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि तीन जखमी झाल्याचे सांगितले. वृत्तानुसार, इस्लामाबादने किमान १३३ अफगाण लढवय्ये ठार आणि २०० हून अधिक जखमी झाल्याचा दावा केला असून २७ अफगाण चौक्या नष्ट करून नऊवर ताबा मिळवल्याचे म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode