
मुंबई, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। मार्च महिन्यात बँकेत काही महत्त्वाचे काम असल्यास सुट्ट्यांचे नियोजन आधीच करून ठेवणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) दरवर्षीप्रमाणे विविध राज्ये आणि शहरांनुसार बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. त्यानुसार मार्च महिन्यात अनेक सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँकांचे कामकाज काही दिवस ठप्प राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत व्यवहार पूर्ण करणे आवश्यक आहे.
फेब्रुवारी महिन्याचा चौथा शनिवार 28 फेब्रुवारी रोजी आल्यामुळे त्या दिवशी देशभरातील बँका बंद असतील. त्यानंतर 1 मार्च हा रविवार असल्याने सलग दुसऱ्या दिवशीही बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे 27 फेब्रुवारीपर्यंतच आवश्यक व्यवहार पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे.
मार्च महिन्यातील नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये 1, 8, 15, 22 आणि 29 मार्च या रविवारी बँका बंद राहतील. तसेच 14 मार्च हा दुसरा शनिवार आणि 28 मार्च हा चौथा शनिवार असल्याने त्या दिवशीही बँकांचे कामकाज होणार नाही.
2 मार्च रोजी कानपूर आणि लखनौ येथे होलिका दहन निमित्त बँका बंद राहतील. इतर शहरांमध्ये मात्र त्या दिवशी नियमित कामकाज सुरू राहणार आहे. 3 आणि 4 मार्च रोजी डोल जतरा, धुलिवंदन आणि होळी निमित्त देशातील अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. भोपाळ, देहरादून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर आणि पाटणा येथे 3 व 4 मार्चला सुट्टी असेल. 4 मार्च रोजी होळी निमित्त अहमदाबाद, भुवनेश्वर, चंदीगड, इम्फाळ, ईटानगर, जम्मू, कानपूर, लखनौ, नवी दिल्ली आणि रायपूरसह इतर काही शहरांत बँका बंद राहतील.
13 मार्च रोजी चापचर कुट सणानिमित्त आयजोल येथे बँकांना सुट्टी असेल. 17 मार्च रोजी शब-ए-कद्र निमित्त जम्मू आणि श्रीनगर येथे बँका बंद राहतील. 19 मार्च रोजी गुढी पाडवा निमित्त महाराष्ट्रासह सुमारे 11 राज्यांतील विविध शहरांत बँका बंद राहण्याची शक्यता आहे. 20 मार्च रोजी ईद-उल-फित्र आणि जुमात-उल-विदा निमित्त पाच राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. 26 आणि 27 मार्च रोजी श्री रामनवमी निमित्त काही राज्यांमध्ये बँकांचे कामकाज बंद राहील. तसेच 31 मार्च रोजी महावीर जयंतीनिमित्त 15 राज्यांतील शहरांत बँका बंद असतील.
दरम्यान, शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करता येणार आहेत. त्यामुळे रोख रक्कम काढणे, ऑनलाइन पैसे पाठवणे किंवा इतर डिजिटल व्यवहारांमध्ये अडचण येणार नाही. मात्र चेक क्लिअरन्स, डीडी किंवा शाखेशी संबंधित कामांसाठी संबंधित तारखा लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule