
रायगड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत मौजे म्हसळा-दिघी रोडवरील मेंदडी गावाच्या हद्दीत दुर्दैवी अपघाताची घटना घडली. आरोपी रा. बेलदारवाडी, ता. म्हसळा हा त्याच्या ताब्यातील बजाज कंपनीची मोटारसायकल (क्र. MH 46 BS 6376) चालवत मौजे दिघी बाजूकडून म्हसळा बाजूकडे येत होता. त्यावेळी मयत गौतम कृष्णा दाभाणे (वय 55 वर्षे, रा. रूम क्र. 03, समर्थ नगर, रोहा, ता. रोहा, जि. रायगड) हे मोटारसायकलच्या मागील सीटवर बसले होते.
मेंदडी गावाच्या हद्दीत उतारावरील सिमेंट रस्त्यावर अचानक एक बकरी आडवी आल्याने तिला वाचविण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मोटारसायकल घसरून चालक व मागील सीटवरील गौतम दाभाणे रस्त्यावर पडले. या अपघातात गौतम दाभाणे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात चालकाने मोटारसायकल भरधाव वेगात, हयगयीने व निष्काळजीपणे चालविल्याने ताबा सुटून वाहन घसरल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपघातात मोटारसायकलचेही नुकसान झाले असून चालक स्वतःही जखमी झाला आहे.
या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 26/2026 अन्वये मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106, 281, 125(B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ/म्हात्रे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके