इराण, रशियाची पाक- अफगाणिस्तानला सीमापार हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन
तेहरान , 27 फेब्रुवारी (हिं.स.)।अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू झालेल्या युद्धावर रमजानच्या पवित्र महिन्यात युद्ध छेडणे अयोग्य असल्याचे इराणने म्हटले आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला इस्लामच्या हित
इराण, रशियाची पाक- अफगाणिस्तानला सीमापार हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन


तेहरान , 27 फेब्रुवारी (हिं.स.)।अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू झालेल्या युद्धावर रमजानच्या पवित्र महिन्यात युद्ध छेडणे अयोग्य असल्याचे इराणने म्हटले आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला इस्लामच्या हितासाठी एकत्र येण्याचे आणि संवादाच्या माध्यमातून हा वाद मिटवण्याचे आवाहन केले आहे. याचसोबत रशियानेही दोन्ही देशांना सीमापार हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे.

अब्बास अराघची यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले आहे, “रमजानच्या पवित्र महिन्यात, जो इस्लामी जगतात आत्मसंयम आणि एकात्मता दृढ करण्याचा काळ मानला जातो, अशा वेळी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांनी चांगल्या शेजारी संबंधांच्या चौकटीत राहून आणि संवादाच्या माध्यमातून विद्यमान मतभेद सोडवणे उचित ठरेल. इराण दोन्ही देशांमध्ये संवाद सुलभ करण्यासाठी तसेच परस्पर समज आणि सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्यास तत्पर आहे.”

रशियाने दोन्ही देशांना सीमापार हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे.रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी आपले मतभेद कूटनीतिक मार्गाने सोडवावेत, असे म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानने गुरुवारी मध्यरात्री अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. राजधानी काबूलमधील अनेक लष्करी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. या कारवाईत अफगाणिस्तानच्या लष्करी ठिकाणांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे, माहितीनुसार, पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी सांगितले की या चकमकीत १३३ अफगाण तालिबान लढवय्ये ठार झाले असून २०० हून अधिक जखमी झाले आहे. तर तालिबान सरकारने त्यांच्या ८ लढवय्यांचा मृत्यू झाल्याची आणि ११ जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

त्याचवेळी, तालिबानने असा दावाही केला आहे कि, अफगाणिस्तानच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत पाकिस्तानचे ५५ सैनिक ठार झाल्याचा, १९ चौक्यांवर ताबा मिळवल्याचा आणि २३ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तालिबानने पाकिस्तानचे महत्त्वाचे एफ-१६ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. मात्र, पाकिस्तानने त्यांच्या केवळ दोन सैनिकांच्या मृत्यूचीच पुष्टी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande