
मुंबई, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी उन्नत तंत्रज्ञान आणि पॉवरट्रेन कंट्रोल सिस्टीम विकसित करणाऱ्या सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स लिमिटेडने आपल्या १,०८७ कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीची (आयपीओ) घोषणा केली आहे. हा आयपीओ ४ मार्च २०२६ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून ६ मार्चपर्यंत खुला राहील. अँकर गुंतवणूकदारांसाठी इश्यू २ मार्चलाच उघडण्यात येणार आहे.
कंपनीने या आयपीओसाठी प्रति समभाग १,२८७ ते १,३५२ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. किंमत पट्ट्याच्या उच्च मर्यादेनुसार कंपनीचे एकूण बाजारमूल्य 5,970.6 कोटी रुपये इतके अपेक्षित आहे. हा संपूर्ण इश्यू ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) स्वरूपाचा असून कंपनीकडून कोणतेही नवीन समभाग जारी केले जाणार नाहीत. विद्यमान प्रवर्तक आणि गुंतवणूकदार त्यांच्या मालकीतील एकूण ८०.४३ लाख समभाग विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे या आयपीओतून मिळणारी रक्कम थेट विक्री करणाऱ्या भागधारकांकडे जाणार असून कंपनीला त्यातून भांडवल मिळणार नाही.
सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स ही कंपनी प्रामुख्याने दुचाकी आणि तिनचाकी आंतरिक ज्वलन इंजिन (ICE) वाहनांसाठी ‘सेंसर-लेस कम्युटेशन’ तंत्रज्ञानावर आधारित इंटीग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG) आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ECU) तयार करते. ही तंत्रज्ञान प्रणाली वाहनांची इंधन कार्यक्षमता वाढविण्यास आणि उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. कंपनीच्या ग्राहकांमध्ये TVS Motor Company, Bajaj Auto, Kirloskar Oil Engines तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील Briggs & Stratton यांसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
समभागांचे वाटप ९ मार्च रोजी अंतिम होण्याची शक्यता असून परताव्याची प्रक्रिया १० मार्चपर्यंत पूर्ण होईल. कंपनीचे समभाग ११ मार्च रोजी बीएसई आणि एनएसई येथे सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. ऑटो-टेक क्षेत्रातील मजबूत उपस्थिती आणि भक्कम ग्राहकवर्गामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांचा या आयपीओकडे कल राहू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule