
काबूल, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।पाकिस्तानी वायुदलाने गुरुवारी रात्री अफगाणिस्तानमधील काबूल आणि कंदहार येथे हवाई हल्ले केले. या हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननेही पाकिस्तानवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्याने दोन्ही देशांतील तणाव अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. पाकिस्तानने या लष्करी मोहिमेला ‘ऑपरेशन गजब लिल-हक’ असे नाव देत उघड युद्धाची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा दावा आहे की त्यांच्या हल्ल्यात 130 हून अधिक तालिबानी लढवय्ये ठार झाले. तर तालिबानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 55 सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे.या सर्व घडामोडींमध्ये तालिबान शासनाच्या संरक्षण मंत्रालयाने इस्लामाबादमधील एका लष्करी छावणीवर बॉम्बहल्ला केल्याचा दावा केला आहे. ही माहिती मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली. तसेच जमरूद मिलिटरी कॉलनी आणि एबटाबाद येथेही हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे.
तालिबान शासनाच्या संरक्षण मंत्रालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “संरक्षण मंत्रालयाच्या वायुदलाने आज सकाळी सुमारे ११ वाजता हवाई हल्ले केले. या हल्ल्यांचे लक्ष्य इस्लामाबादमधील फैजाबादजवळील एक लष्करी छावणी आणि नौशेरा येथील लष्करी तळ होते.” या कारवाईबाबत तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की पाकिस्तानकडून झालेल्या एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पोस्ट करत म्हटले, “भ्याड पाकिस्तानी सैन्याने काबूल, कंदहार आणि पक्तिया प्रांतातील काही भागांवर हवाई हल्ले केले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.”
वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सैन्याने काबूल, कंदहार आणि पक्तिया प्रांतांतील अफगाण लष्करी तळांना लक्ष्य करत हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत दोन ब्रिगेड तळ उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र संभाव्य जीवितहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode