एकही धुळवड कधी मिस केली नाही - अभिनेत्री दीप्ती केतकर
मुंबई, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। ''सन मराठी वरील ''मी संसार माझा रेखिते'' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. नवनवीन ट्विस्ट आणि रंजक कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. नुकतंच प्रेक्षकांनी सोशल
“एकही धुळवड कधी मिस केली नाही” अभिनेत्री दीप्ती केतकरने शेअर केल्या होळीच्या आठवणी*


मुंबई, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। 'सन मराठी वरील 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. नवनवीन ट्विस्ट आणि रंजक कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.

नुकतंच प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालिकेतील कलाकारांना पत्र पाठवली होती. या पत्रांमधून प्रेक्षकांची मालिकेप्रती असलेली ओढ, प्रेम आणि आपुलकी स्पष्टपणे दिसून आली. या प्रेमळ प्रतिसादाबद्दल मालिकेतील अनुप्रिया म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकरने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. याचवेळी तिने आपल्या होळीच्या आठवणीही प्रेक्षकांसोबत शेअर केल्या.

दीप्ती केतकर म्हणाल्या की, सर्वप्रथम मालिकेवर प्रचंड प्रेम करण्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार . होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तर मनातील सगळ्या नकारात्मक भावना जाळून टाकण्याचा उत्सव आहे. आपल्या आजूबाजूला होणारे हेवे-दावे, राग, मत्सर अशा सगळ्या गोष्टी होलिकेत दहन व्हाव्यात, असं मला मनापासून वाटतं. प्रत्येकाच्या नशिबात जे असतं, ते त्यांना मिळतंच. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र हसत-खेळत राहणं मला जास्त आवडतं. लहानपणी होळीची मज्जा काही वेगळीच असायची. धुलीवंदनाची तयारी एक दिवस आधीपासूनच सुरू व्हायची. रंग आणि पाणी मिसळून फुगे तयार करायचो आणि ते एक पूर्ण बादली भरून ठेवायचो. त्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत.

पुढे म्हणाल्या की, लहानपणी जशी होळी साजरी करायचे, तितक्याच उत्साहाने मी आता माझ्या सासरीही होळी साजरी करते. बरेच जण मोठे झाल्यावर धुलीवंदन साजरी करत नाहीत, पण या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. माझं पूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवार दिवसभर रंगांची उधळण करत असतो. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मी प्रत्येक धुलीवंदनाला हमखास सुट्टी घेते. आजपर्यंत एकही धुळवड मी मिस केलेली नाही. आता मालिकेत होळी कशी साजरी होणार, हे मी सांगू शकत नाही; पण प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande