
मुंबई, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। मराठीचे वैभव जगासमोर आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मराठी मूड’ चॅनलतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘बोला मराठी’ पुरस्कार सोहळा प्रभादेवी, मुंबई येथील पु.ल.देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर येथे अत्यंत दिमाखात संपन्न झाला. २१ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झालेल्या या स्पर्धेत अवघ्या एका आठवड्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक येथून स्पर्धक सहभागी झालेच; शिवाय भारताबाहेरूनही पाकिस्तान आणि दुबईसह जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“मराठी माझ्यासाठी काय आहे?” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत वय वर्षे ५ पासून ते ६५ वर्षांच्या आजींपर्यंत अनेकांनी कविता, कथाकथन, गाणी आणि स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातून आपले विचार मांडले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि परीक्षक म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव, ज्येष्ठ साहित्यिक व बालकवी एकनाथ आव्हाड आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर नील साळेकर (Just Neel Things) यांची खास उपस्थिती होती. अभिनेत्री संजना पाटील यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. संपुर्ण कार्यक्रम marathimood या युट्यूब चॅनल वर उपलब्ध होणार आहे.
बालगट, शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट अशा चार गटांतील सादरीकरणांच्या व्हिडिओंचे परीक्षण करून परीक्षकांनी अंतिम १६ विजेत्यांची घोषणा केली. गटानुसार घोषित विजेत्यांची नावे ‘मराठी मूड’ यूट्यूब चॅनलवर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी जाहीर होणार आहेत.
मराठी भाषेसाठी असे कार्यक्रम सतत होत राहिले पाहिजेत आणि ‘बोला मराठी’ या उपक्रमामुळे मराठी भाषेला जागतिक मंच उपलब्ध होत आहे, यासाठी संजय जाधव यांनी ‘मराठी मूड’चे अभिनंदन केले.
छोटे चॅनल असूनही मराठी भाषेसाठी मोठे पाऊल उचलून ते कमी कालावधीत यशस्वी केल्याबद्दल बालकवी एकनाथ आव्हाड यांनी कौतुक केले.
नव्या मराठी पिढीला मराठीचे बाळकडू पाजण्याचे काम ‘मराठी मूड’ करत आहे, असे कौतुक जस्ट नील नील साळेकर यांनी केले.
परीक्षकांनी दिलेल्या गुणांप्रमाणे चारही गटांतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असे अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे.
स्पर्धेतील सहभागी पर्शियन बीता आणि पाकिस्तानी जहानवी यांना ‘मराठी मूड’तर्फे २५ हजार रुपयांचा विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
पुढील वर्षी आणखी भव्य नियोजन: बोला मराठी उपक्रमाद्वारे स्वयंस्फुर्तीने मराठी बोलण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. अवघ्या ७ दिवसांच्या तयारीनंतरही मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा आहे. पुढच्या वर्षी हा उपक्रम अधिक मोठ्या स्तरावर राबवला जाईल,” अशी माहिती ‘मराठी मूड’चे चॅनल हेड शंतनु जोशी यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर