हल्ल्याला निर्णायक उत्तर दिले जाईल, इराणचा अमेरिका-इस्रायलला इशारा
- संयुक्त राष्ट्रांनी तातडीने हस्तक्षेप करण्याचीही मागणी- इराणमधील ५१ निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू तेहरान, 28 फेब्रुवारी (हिं.स.) - पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण–इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिक
हल्ला


- संयुक्त राष्ट्रांनी तातडीने हस्तक्षेप करण्याचीही मागणी- इराणमधील ५१ निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू

तेहरान, 28 फेब्रुवारी (हिं.स.) - पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण–इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त हल्ल्यानंतर इराणने कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याचा अमेरिका आणि इस्त्रायलला पश्चाताप होईल असं निर्णायक उत्तर देऊ, असा इशारा इराणने दिला आहे. तसेच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही इराणने केली आहे.

अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी सकाळी इराणवर एकाच वेळी ३० ठिकाणी हल्ले करून युद्धाला सुरुवात केली आहे. आम्ही इराणला अण्वस्त्रधारी देश बनू देणार नाही, अशी धमकी देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे. इस्रायल-अमेरिकेने केलेल्या या लष्करी कारवाईत इराणमधील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात ५१ विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच ६०हून अधिक मुली जखमी झाल्या आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी याला दुजोरा दिला असून, या घटनेमुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याने या संघर्षाला आता अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत तब्बल ५ देशांवर हल्ले केले आहे. इराणने इस्रायलवर मिसाइल हल्ले केले आहेत. त्याशिवाय इराणने आखाती देशांमधील कुवेत, बहरीन, अबु धाबी, कतार या ठिकाणीही हल्ले केले आहे. त्यामुळे आखाती देशांनी आपल्या हवाई हद्द बंद केली आहे. अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेचा सगळ्यात मोठा लष्करी तळ बहरीनमध्येही हल्ला केला. बहरीनमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सायरन वाजण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या जुफैर तळावर इराणकडून हल्ला करण्यात आला. अमेरिका इस्रायल यांच्या हल्ल्यानंतर इराणने सौदी अरेबिया, कतार, बहरीन यासारख्या देशातील अमेरिकन तळांना टार्गेट केले आहे. त्यामुळे या हल्ल्यात ५ देशांना ओढण्याचा प्रयत्न इराणने केला आहे.

सौदी अरेबिया, कुवैत यासारख्या ठिकाणीही इराणने हल्ले चढवल्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेल पुरवठा साखळी यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तेल साठ्यावर याचा परिणाम झाल्यानंतर जगात तेल महागण्याचीही शक्यता आहे. अमेरिका-इस्रायलने हल्ला केल्यास आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा पवित्रा इराणने घेतला होता. त्यामुळेच अमेरिका आणि इराण यांच्या संघर्षात या देशांनी भूमिका घेणे टाळले होते. मात्र आता अमेरिका-इस्रायल यांच्या हल्ल्यानंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्रायलचा हल्ला हा देशाच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा भंग असल्याचे म्हटलं आहे. एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायलने हल्ला करत संयुक्त राष्ट्र सनदेतल्या कलम 2(4) चे उल्लंघन केल्याचा दावा इराणने केला. परकीय दबावापुढे आतापर्यंत कधीही झुकलो नाही आणि या वेळी त्याला निर्णायक आणि ठोस उत्तर देऊ, असं इराणने म्हटलं आहे. इस्रायलच्या प्रत्युत्तरासाठीच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर इराणने संयुक्त राष्ट्रांकडे औपचारिक दाद मागितली आहे. या संघर्षात आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी तेहरानने केली आहे.

तणाव वाढल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी भूमिगत झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, इराणने नॅशनल सुप्रीम सिक्युरिटी कौन्सिलच्या बैठकीतील त्यांचा फोटो जाहीर केला. यामुळे नेतृत्व सुरक्षित आणि सक्रिय असल्याचा संदेश इराणकडून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नागरिकांना उद्देशून दिलेल्या संदेशात इराणमधील 'दहशतवादी शासन संपवण्यासाठी' मोहीम सुरू केल्याचे सांगितले. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. नेतन्याहूंच्या मते, इराणमधील अयातुल्ला शासनाने गेल्या अनेक दशकांत इस्रायल आणि अमेरिकेविरोधात कारवाया केल्या असून त्यांना अण्वस्त्रे मिळू देणे हे संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक ठरेल.

इराण–इस्रायल संघर्ष वाढत गेल्यास पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या महासत्तांची भूमिका निर्णायक ठरू शकते. भारतासारख्या देशांवरही याचे परिणाम तेलपुरवठा, व्यापार आणि सुरक्षा दृष्टीने होऊ शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande