
कोलंबो, 28 फेब्रुवारी (हिं.स.)टी-२० विश्वचषकाचा सुपर एट टप्पा संपण्याच्या जवळ आला आहे. पण केवळ दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. गट १ मधून दक्षिण आफ्रिका आणि गट २ मधून इंग्लंड पुढील फेरीत पोहोचले आहेत. उर्वरित दोन स्थानांसाठी चार संघ स्पर्धा करत आहेत. गट १ मधील परिस्थिती स्पष्ट आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रविवारी होणाऱ्या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीत पोहोचेल. पण गट २ मध्येही जोरदार स्पर्धा आहे. ज्यामध्ये नेट रन रेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानला दिलासा
टी-२० विश्वचषक सुपर एट सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवल्याने गट २ ची परिस्थिती बदलली आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सात बाद १५९ धावा केल्या. तर इंग्लंडने १९.३ षटकांत सहा बाद १६१ धावा करून विजय मिळवला.न्यूझीलंडवर इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानला दिलासा मिळाला आहे. कारण विजयाने पाकिस्तानचा सुपर एटमधील प्रवास संपला असता. पण न्यूझीलंडच्या पराभवामुळे ग्रुप २ मधील उपांत्य फेरीचे समीकरण बदलले आहे आणि सर्वांचे लक्ष आता श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर आहे इंग्लंडने आधीच पात्रता मिळवली आहे, म्हणजेच या गटातील दोन संघ आता एका उपांत्य फेरीसाठी स्पर्धा करत आहेत.
सुपर आठ टप्प्यातील ग्रुप २ बद्दल, इंग्लंडने त्यांचे तिन्ही सामने जिंकले आहेत आणि सहा गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. न्यूझीलंड तीन सामन्यांतून तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यामध्ये एक विजय, एक पराभव आणि एक रद्द केलेला सामना आहे. न्यूझीलंडचा नेट रन रेट +१.३९० आहे. पाकिस्तान दोन सामन्यांतून एक गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यामध्ये एक पराभव आणि एक रद्द केलेला सामना आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट -०.४६१ आहे. दरम्यान, सह-यजमान श्रीलंकेने सुपर आठमध्ये आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमाल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. श्रीलंकेला बाहेर पडावे लागले असले तरी, शनिवारी त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. श्रीलंकेकडे गमावण्यासारखे काहीही शिल्लक नाही. पण पाकिस्तानसाठी सर्व काही गमावलेले नाही.
पाकिस्तान उपांत्य फेरीत कसे पोहोचण्याची संधी
इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडच्या पराभवामुळे उपांत्य फेरीची शर्यत रंजक बनली आहे. येथून, नेट रन रेट महत्त्वाचा बनतो. याचा अर्थ पाकिस्तानला केवळ श्रीलंकेला पराभूत करावे लागणार नाही, तर मोठा विजय देखील नोंदवावा लागेल. जर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आणि १६० धावा केल्या तर त्यांना ६४ किंवा त्याहून अधिक धावांनी सामना जिंकावा लागेल. जर पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केली आणि श्रीलंकेला १६० धावांपर्यंत रोखले तर त्यांना ४०+ चेंडूत किंवा १३.१ षटकांत हे लक्ष्य गाठावे लागेल. जर पाकिस्तान असे करण्यात अपयशी ठरला तर न्यूझीलंड त्यांच्या चांगल्या नेट रन रेटच्या आधारे उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे