
तेहरान, 01 मार्च (हिं.स.)।इस्रायल-अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. इराणी माध्यमांनी याची पुष्टी केली आहे. शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला, त्या वेळी खामेनेई आपल्या कार्यालयात उपस्थित होते. या हल्ल्यात खामेनेई यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाला आहे. या अपूरणीय हानीबद्दल इराण सरकारने ४० दिवसांच्या राजकीय शोकाची घोषणा केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उशिरा रात्रीच खामेनेई यांच्या मृत्यूचा दावा केला होता.
इराणच्या मीडिया रिपोर्टनुसार, आयातुल्ला अली खामेनेई शनिवारी पहाटे आपल्या घरातील कार्यालयात बसले होते. इस्रायल आणि अमेरिका हल्ला करणार आहेत, याची त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. इस्रायल आणि अमेरिकेला खामेनेई नेमके कुठे आहेत, याची माहिती होती. त्यामुळे त्यांच्या घरातील कार्यालयावर तसेच इराणच्या राष्ट्रपती भवनाजवळ क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्या वेळी खामेनेई घरातील कार्यालयातच होते. क्षेपणास्त्र कोसळताच परिसरात काळ्या धुराचे ढग पसरले. या भीषण हल्ल्यात तेहरानमधील खामेनेई यांचे संकुल पूर्णतः उद्ध्वस्त झाले. या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला.
इस्रायल-अमेरिकेने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत तेहरानवर हल्ला केल्याचे सांगितले आहे. या कारवाईत खामेनेई यांच्यासह त्यांच्या मुलगी, जावई आणि नातीचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तेहरानमध्ये क्षेपणास्त्र आणि बॉम्बहल्ल्यांद्वारे केलेली ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती निश्चित करून आखण्यात आल्याचे मानले जाते. दरम्यान या हानीबद्दल इराण सरकारने ४० दिवसांच्या राजकीय शोकाची घोषणा केली आहे. तसेच, सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनेई यांच्या मृत्यूनंतर ट्रुथ या सोशल मीडियाला पोस्ट करत लिहिले, “इतिहासातील सर्वांत क्रूर व्यक्तींमधील एक असलेला खामेनेई आता मरण पावला आहे. हे केवळ इराणच्या जनतेसाठी न्याय नाही, तर सर्व महान अमेरिकन नागरिकांसाठी आणि जगभरातील त्या अनेक देशांतील लोकांसाठीही न्याय आहे, ज्यांना खामेनेई आणि त्याच्या रक्तरंजित गुंडांच्या टोळीने ठार मारले किंवा गंभीर जखमी केले.”
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणची इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) यांचेही निवेदन समोर आले आहे. निवेदनात म्हटले आहे, “आम्ही एक महान नेता गमावला आहे. त्यांच्या आत्म्याची पवित्रता, श्रद्धेची ताकद, दूरदृष्टी, अत्याचार्यांसमोर दाखवलेले धैर्य आणि अल्लाहच्या मार्गातील संघर्ष यांमुळे ते आपल्या युगात अद्वितीय होते. तथापि, त्यांचे बलिदान आम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवेल. आम्ही त्यांच्या मृत्यूचा बदला घेऊ. अल्लाहच्या मार्गात जे मारले गेले, त्यांना मृत समजू नका; ते आपल्या परमेश्वराकडे जिवंत आहेत.”
इराणी सैन्याने पुढे म्हटले आहे, “इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स, इस्लामिक प्रजासत्ताक इराणचे सशस्त्र दल आणि विशाल बसीज दल आपल्या या नेत्याच्या अमूल्य वारशाचे रक्षण करण्यासाठी पूर्ण ताकदीने त्यांच्या मार्गावर चालत राहतील. देशाविरुद्धच्या अंतर्गत आणि बाह्य कटकारस्थानांना तोंड देत आक्रमकांना धडा शिकवण्यासाठी आम्ही ठाम आहोत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode