
तेहरान , 01 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या मोठ्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या सत्तेत मोठा बदल झाला आहे. अमेरिकेने आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात दीर्घकाळ इराणचे सर्वोच्च नेते राहिलेले अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर देशात नेतृत्व बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ धर्मगुरू अयातुल्ला अलीरेजा अराफी यांची इराणचे नवे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अनेक लष्करी आणि शासकीय ठिकाणांवर मोठा हल्ला केला. या कारवाईत उच्चस्तरीय लष्करी आणि राजकीय नेतृत्वाशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. १९८९ पासून इराणचे नेतृत्व करत असलेल्या ८६ वर्षीय अली खामेनेई यांचा याच हल्ल्यात मृत्यू झाला. सुरुवातीला इराणने या वृत्तांचे खंडन केले होते, मात्र नंतर त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली. त्यानंतर घटनात्मक तरतुदीनुसार अंतरिम नेतृत्व व्यवस्था लागू करण्यात आली.
अयातुल्ला अलीरेजा अराफी हे इराणमधील वरिष्ठ धार्मिक नेते मानले जातात. त्यांना अंतरिम नेतृत्व परिषदेतील न्यायविद सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. हीच परिषद आता सर्वोच्च नेत्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहे. अराफी सध्या देशाच्या सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय पदाची जबाबदारी सांभाळतील. संक्रमण काळात शासनव्यवस्था स्थिर ठेवणे आणि नवीन कायमस्वरूपी सर्वोच्च नेत्याची निवड होईपर्यंत नेतृत्व करणे, ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल.
इराणच्या संविधानानुसार सर्वोच्च नेत्याच्या निधनानंतर अंतरिम परिषद स्थापन केली जाते.या परिषदेत राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांचा समावेश असतो.मुख्य न्यायाधीश गुलाम-हुसैन मोहसनी एजई हेही या परिषदेचे सदस्य असतात.गार्डियन कौन्सिलमधील एक वरिष्ठ धर्मगुरू परिषदेत सहभागी असतो.ही संयुक्त नेतृत्व व्यवस्था देशाच्या प्रशासन आणि सुरक्षेसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode