
तेहरान, 01 मार्च (हिं.स.)।इराणने रविवारी ओमानच्या मुसँडम द्वीपकल्पापासून सुमारे ५ सागरी मैल अंतरावर पलाऊ ध्वज असलेल्या ‘स्कायलाइट’ या तेलवाहू टँकरला लक्ष्य केले. जहाजावरील सर्व २० कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी १५ जण भारतीय नागरिक होते. या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत.
कतारने ओमानमधील दुक्म या व्यापारी बंदरावर तसेच त्याच्या किनाऱ्याजवळ असलेल्या तेलवाहू टँकरवर करण्यात आलेल्या इराणी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “हे हल्ले ओमानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असून मध्यस्थी प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणाऱ्या देशाला लक्ष्य करण्याचे भ्याड कृत्य आहे.”
इराणी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, यावेळी इराणवर असा हल्ला केला जाईल, जो यापूर्वी कधीही पाहिला गेला नसेल. त्यानंतर अमेरिकेने इराणवर पुन्हा मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू केले असून तेहरानमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. या हल्ल्यात अमेरिकेने इराणचे लष्करप्रमुख मुसावी यांना ठार केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, इराणकडून इस्रायलसह संपूर्ण मध्य-पूर्वेतील अमेरिकन तळांवर सातत्याने हल्ले सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला. त्यांनी खामेनेई यांच्या शासनाला दहशतवादी शासन असे संबोधले. नेतन्याहू यांनी इशारा देत म्हटले की, येत्या काही दिवसांत आम्ही दहशतवादी शासनाच्या हजारो ठिकाणांवर हल्ले करू.
इस्रायली सैन्याने राजधानी तेहरानला लक्ष्य केले असल्याचे सांगितले आहे. यामध्ये तेहरान येथे ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तेहरान प्रांत रेड क्रेसेंट सोसायटीच्या माहितीनुसार, इराणची सरकारी वृत्तसंस्थाने म्हटले आहे की, तेहरानमध्ये गेल्या २४ तासांत ६० हल्ले झाले असून त्यात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्राइल काट्झ यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सैन्य इराणी शासनाशी संबंधित ठिकाणांवर लक्ष्य साधून तीव्र हल्ले करत आहे. काट्झ यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे की, तेहरानमधील निश्चित लक्ष्यांवर जोरदार प्रहार करण्यासाठी आम्ही सातत्याने हवाई हल्ले करत राहू.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode