
तेहरान , 01 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत इराणवर हवाई हल्ले केले. त्याच्या प्रत्युत्तरात इराणने विविध देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
इराणी मीडिया रिपोर्टनुसार, मागील ४० तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या बॉम्बहल्ल्यांत २१५ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.इराण वगळता इस्रायल आणि इतर देश मिळून १००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एकट्या इराणमध्ये २०१ जणांचा मृत्यू झाला असून ७४० हून अधिक जखमी झाले आहेत. इराक, कुवैत, कतार, बहरीन, ओमान आणि यूएईमध्येही हानी झाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कुवैतच्या आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, क्षेपणास्त्र हल्ले आणि बॉम्बस्फोटांदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अल-अदान रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी इराणी क्षेपणास्त्र हल्ले सुरू झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून ५८ जण जखमी झाले आहेत. अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने ही कारवाई केली. यूएईच्या संरक्षण मंत्रालयानुसार १६५ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा शोध लागला, त्यापैकी १५२ नष्ट करण्यात आली. दोन क्रूझ क्षेपणास्त्रे अडवण्यात आली. एकूण ५४१ इराणी ड्रोनपैकी ५०६ ड्रोन पाडण्यात आले. या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश येथील नागरिकांचा समावेश आहे.
अहवालानुसार, इस्रायलमधील बेत शेमेश परिसरात इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यात मृतांची संख्या नऊवर पोहोचली आहे. इस्रायलने सीरियाच्या हवाई क्षेत्रात एक इराणी क्षेपणास्त्र अडवण्यात यश मिळवले असल्याचे वृत्तसंस्थेने सांगितले. सीरियात अडवलेल्या क्षेपणास्त्राचा स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज राजधानी दमास्कसपर्यंत ऐकू आला.
अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने “ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४” सुरू केल्याचे सांगितले आहे. इराण रिव्होल्युशनरी गार्ड्स (आयआरजीसी) यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकन नौदलाच्या अब्राहम लिंकन या विमानवाहू नौकेवर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे.दरम्यान, इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला आहे. इराण दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी झालेल्या हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी आज देशवासियांना दिलेल्या पहिल्या संदेशात म्हटले की, इराण इस्रायल आणि अमेरिकन लष्करी तळांवर “कठोर हल्ले सुरू ठेवेल.” दूरचित्रवाणीवर प्रसारित केलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की देश केवळ हल्ले सुरू ठेवणार नाही, तर सर्वोच्च नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासही कटिबद्ध आहे. त्यांनी म्हटले, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची सशस्त्र सेना कठोर हल्ले सुरू ठेवेल. आमची सेना शत्रूंचे लष्करी तळ उद्ध्वस्त करत राहील. क्रांतीच्या नेत्यांचे शहादत ही अनेक वर्षांच्या बलिदानांचे फलित आहे.”
राष्ट्राध्यक्षांव्यतिरिक्त परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, इराण आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहे. त्यांनी म्हटले, “स्वतःचा बचाव करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आमच्यासाठी मर्यादांची कोणतीही अडचण नाही.” अहवालानुसार, खामेनेई यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की देशात घटनात्मक प्रक्रिया सुरू झाली आहे. निर्णय घेण्यासाठी ट्रान्झिशनल कौन्सिल स्थापन करण्यात आली असून ती महत्त्वाची कामे पाहणार आहे. सर्वोच्च नेता खामेनेई यांच्या हत्येला “अत्यंत गंभीर” संबोधत त्यांनी म्हटले की, असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता आणि हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा उघड उल्लंघन आहे. या घटनेमुळे संघर्ष अधिक धोकादायक वळण घेऊ शकतो.
अब्बास अराघची यांनी पुढे सांगितले की, “खामेनेई यांच्या जागी कोण येणार, यासाठी इराणच्या राज्यघटनेत ठरावीक प्रक्रिया आहे. आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे. आज स्थापन करण्यात आलेल्या ट्रान्झिशन कौन्सिलमध्ये राष्ट्राध्यक्ष, न्यायपालिकेचे प्रमुख आणि गार्डियन कौन्सिलमधील एक न्यायशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, नवीन सर्वोच्च नेता निवडला जाईपर्यंत तीन सदस्यीय गट नेतृत्वाची जबाबदारी सांभाळेल. त्यानंतर असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स नवीन नेत्याची निवड प्रक्रिया पूर्ण करेल. त्यांच्या मते, एक-दोन दिवसांत नव्या नेत्याची निवड होऊ शकते.
अब्बास अराघची यांनी पश्चिम आशिया आणि खाडी देशांच्या भूमिकेबाबत सांगितले की, “मी या प्रदेशातील सर्व सहकाऱ्यांशी संपर्कात आहे. आम्ही त्यांना इराणची भूमिका स्पष्ट केली आहे. या युद्धासाठी इराण जबाबदार नाही. हे युद्ध अमेरिका आणि इस्रायलने लादले आहे. जर या प्रदेशातील देश नाराज असतील, तर त्यांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधात संताप व्यक्त करावा.”
अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की इराणला होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याचा सध्या कोणताही हेतू नाही. “सध्या जहाजांच्या वाहतुकीत अडथळा आणण्याची कोणतीही योजना नाही. आम्ही केवळ अमेरिकन लष्करी तळ आणि त्यांना मदत करणाऱ्या ठिकाणांवर लक्ष्य करत आहोत,” असे त्यांनी सांगितले. अमेरिकेवर टीका करत त्यांनी म्हटले की, अणु विषयक चर्चेदरम्यान अमेरिकेने पुन्हा हल्ला केला. “आम्ही आमच्या भावांवर नव्हे, तर अमेरिकन तळांवर हल्ले करत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode