
मॉस्को , 01 मार्च (हिं.स.)।अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांनी या घटनेला “हत्या” असे संबोधले.याचसोबत चीन आणि उत्तर कोरियानेही इराणवरील हल्ल्यांची तीव्र निंदा केली आहे.
पुतिन यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सर्वोच्च नेते यांच्या हत्येबद्दल माझ्या खोल संवेदना स्वीकाराव्यात. हे मानवी नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्व नियमांचे उघड उल्लंघन आहे.” हा संदेश क्रेमलिनकडून जारी करण्यात आला. पुतिन पुढे म्हणाले की, रशियामध्ये खामेनेई यांना एक मोठे नेते म्हणून स्मरणात ठेवले जाईल. रशिया आणि इराण यांच्यातील संबंध दृढ करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, रशियाच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी इशारा दिला की अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले या प्रदेशाला अणु-संकटाच्या उंबरठ्यावर नेऊ शकतात आणि तणाव आणखी वाढवू शकतात.रशियन परराष्ट्र मंत्रालयानेही या हल्ल्यांचा निषेध करत त्याला “पूर्वनियोजित आणि विनाकारण केलेले सशस्त्र आक्रमण” असे संबोधले. मंत्रालयाने इशारा दिला की या कारवाईमुळे प्रदेश मानवीय, आर्थिक आणि अगदी किरणोत्सर्गी आपत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतो.
इराणवरील हल्ल्यांची चीनने तीव्र निंदा केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदनात म्हटले की, “इराणच्या सर्वोच्च नेत्यांवरचा हल्ला आणि त्यांची हत्या ही इराणच्या सार्वभौमत्व व सुरक्षेचे गंभीर उल्लंघन आहे. हे संयुक्त राष्ट्र सनद आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन आहे.”चीनने तात्काळ लष्करी कारवाया थांबवण्याचे आणि मध्य-पूर्व तसेच जगात शांतता व स्थैर्य राखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
उत्तर कोरियानेही या हल्ल्यांचा निषेध केला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी इस्रायल-अमेरिकेच्या कारवाईवर टीका केली. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या कारवाईला “बेकायदेशीर आक्रमण” आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन असे संबोधले. त्यांनी अमेरिकेच्या भूमिकेला “वर्चस्ववादी आणि गुंडागर्दीच्या प्रवृत्तीचे” उदाहरण म्हटले.
भारतामधील खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी या कारवाईला अमानवीय आणि अनैतिक ठरवले. खामेनेई हे शिया मुस्लिमांचे सर्वोच्च नेते होते, त्यांची हत्या करून इराण शांत बसेल अशी अपेक्षा कशी करता येईल, असा सवाल त्यांनी केला. तसेच भारतानेही या घटनेचा निषेध करावा, अशी मागणी त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode