खामेनेई यांच्या हत्येनंतर कराचीमध्ये हिंसक आंदोलन; 10 ठार, 30 हून अधिक जखमी
इस्लामाबाद , 01 मार्च (हिं.स.)।इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर पाकिस्तानातील कराची शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी माई कोलाची रोड येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळ झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले
खामेनेई यांच्या हत्येनंतर कराचीमध्ये हिंसक आंदोलन; 10 ठार, 30 हून अधिक जखमी


इस्लामाबाद , 01 मार्च (हिं.स.)।इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर पाकिस्तानातील कराची शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी माई कोलाची रोड येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळ झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि आंदोलक व कायदा-सुव्यवस्था दलांमध्ये झटापट झाली. या आंदोलनात १० जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

कराची पोलिसांच्या मुख्य शल्यचिकित्सक डॉ. सुमैया सईद यांनी सांगितले की, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीनंतर मृतांचे मृतदेह कराची सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या किंवा मृत्यूचे नेमके कारण याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आंदोलक दूतावासाच्या आवाराच्या फक्त बाह्य भागापर्यंत पोहोचू शकले होते, त्यानंतर त्यांना पांगवण्यात आले.

माध्यमांच्या वृत्तानुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या गोळ्या फेकल्या आणि लाठीमार केला. या कारवाईत ३० हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना रुग्णवाहिकांद्वारे सिव्हिल हॉस्पिटल कराची येथे दाखल करण्यात आले.

सिंधचे गृहमंत्री जियाउल हसन लांजर यांनी कराचीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आजाद खान यांच्याकडून घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आंदोलकांनी दूतावासाकडे मोर्चा काढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला पांगवले, ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले.

दरम्यान, शनिवारी तेहरान येथे झालेल्या संयुक्त अमेरिकन-इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर कराचीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. १९८९ मध्ये अयातुल्ला रुहोल्लाह खुमैनी यांच्या निधनानंतर खामेनेई इराणचे सर्वोच्च नेते झाले होते आणि त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ देशाचे नेतृत्व केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande