
अकोला, 19 मार्च (हिं.स.)।आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशासह राज्यात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. अनेक ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल, वसतिगृह बंद करण्याची वेळ आली आहे. मात्र अकोल्यातील प्रभात स्कूलमध्ये दररोज पंधराशे पेक्षा जास्त विद्यार्थी व शाळेचा स्टाफ यांची कोणतीही अडचण न येता जेवणाची सोय होत आहे. या शाळेत स्वयंपाक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फ्लेमलेस आणि गॅस विरहित अनोख्या पद्धतीची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.
आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम जागतिक स्तरावर पहायला मिळत आहेत. देशासह राज्यात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याची ओरड होत आहे. अशातच गॅस विरहित पद्धतीमुळे अनेकांची चिंता दूर झाली आहे. अकोल्यातील एका शाळेत दीड हजारांवर विद्यार्थ्यांचा स्वयंपाक शाळेतील पंधराशे पेक्षा जास्त मुलं व शाळेचा स्टाफ, शाळेतच प्रशस्त अशा डायनिंग हॉलमध्ये रोज जेवण घेत आहेत. त्यांच्यासाठी बनवलं जाणार जेवण अतिशय आधुनिक पद्धतीने बनवलेल्या 'फ्लेमलेस किचन'मध्ये रोज तयार होतं. मागील दहा वर्षापासून प्रभात किड्स स्कूलच्या कॅन्टीन मध्ये विद्यार्थ्यांसाठी शिजवलं जाणार अन्न हे या अगदी नवीन अशा सिस्टीम द्वारे बनवलं जातं. 'थर्मिक फ्लुईड हीटर' नावाची एक यंत्रणा शाळेच्या किचनमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे स्वयंपाका करिता लागणारा लागणारे गॅस सिलेंडर इथे बिलकुल वापरण्यात येत नाही. संपूर्ण स्वयंपाक घरात कुठेही विस्तव, आग किंवा गॅस दिसून येत नाही. विशेष म्हणजे त्यामुळे स्वयंपाक घराचं तापमान सुद्धा अतिशय कमी राहतं..दहा वर्षापूर्वी पुण्यात एका मोठ्या हॉटेलमध्ये बघितलेला त्यांनी हा प्रयोग अंमलात आणला आहे.
इथे असलेल्या मोठाल्या कढयांमधून अगदी शंभर दीडशे किलो ची भाजी सुद्धा सहज तयार करता येते. अगदी पोळ्या व पापड सुद्धा इथे या फ्लेमलेस किचनमध्ये तयार होतात. त्यासाठीही कुठलीही ज्योत किंवा आग संपूर्ण स्वयंपाक घरात निदर्शनास येत नाही. विशेष म्हणजे अगदी कमी वेळात इथे भरपूर लोकांचा स्वयंपाक तयार होतो. शिवाय त्याची पौष्टिकता व स्वच्छता सुद्धा सांभाळली जाते. इथे वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा अशा प्रकारचं किचन अतिशय सुरक्षित समजलं जातं.
पर्यायाने इंधनाची बचत होते आणि वेळेची सुद्धा. मागील अनेक वर्षापासून शाळेच्या विद्यार्थ्यांना दिलं जाणार जेवण व त्यांचा नाष्टा या आधुनिक अशा स्वयंपाक घरात अतिशय स्वच्छ व सुंदर वातावरणात तयार होत असल्याने विद्यार्थी सुद्धा त्याचा छान आस्वाद घेतात.
ऐन गॅस टंचाईच्या काळात गॅस सिलेंडर न लागता, इंधनाची बचत, वेळेची बचत, आणि इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षितता या सगळ्या गोष्टी एकाच वेळी साधता आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे