
नवी दिल्ली , 19 मार्च (हिं.स.)।रशिया-युक्रेन आणि इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांमधून स्पष्ट झाले आहे की भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोन आणि अँटी-ड्रोन तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत निर्णायक असणार आहे. त्यामुळे भारताने ड्रोन निर्मिती क्षेत्रात पूर्णपणे आत्मनिर्भर असा सक्षम परिसंस्था (इकोसिस्टम) उभारणे आवश्यक आहे, असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले. ते दिल्ली येथे आयोजित ‘राष्ट्रीय संरक्षण उद्योग परिषदेत’ बोलत होते. यावेळी त्यांनी ‘डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंज’ (DISC) च्या १४व्या आवृत्तीचा शुभारंभ केला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “आज १०० हून अधिक आव्हानांसह ‘डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंज’ (DISC) ची १४वी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या यशाचा विचार करता, प्रथमच संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी (DPSUs) १०० पेक्षा अधिक आव्हाने सादर केली आहेत. या नव्या आवृत्तीसाठी सर्व नवोन्मेषकांना मी शुभेच्छा देतो.”
या परिषदेतला मुख्य उद्देश लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) संरक्षण उत्पादनाच्या पुरवठा साखळीशी जोडणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. लहान उद्योग मोठ्या संरक्षण प्रकल्पांचा भाग बनल्याशिवाय देशात संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाची गती वाढणार नाही, असे त्यांनी अधोरेखित केले. कोणत्याही देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी मोठ्या उद्योगांसोबत MSMEs, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यामध्ये सरकारच्या स्पष्ट धोरणांचाही मोठा वाटा असतो, असे त्यांनी नमूद केले.
जागतिक परिस्थितीचा संदर्भ देताना राजनाथ सिंह यांनी रशिया-युक्रेन तसेच इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, या संघर्षांमधून स्पष्ट झाले आहे की भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोन आणि अँटी-ड्रोन तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत निर्णायक असणार आहे. त्यामुळे भारताने ड्रोन निर्मिती क्षेत्रात पूर्णपणे आत्मनिर्भर असा सक्षम परिसंस्था (इकोसिस्टम) उभारणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, आत्मनिर्भरता केवळ अंतिम उत्पादनापुरती मर्यादित नसावी. ड्रोनचे प्रत्येक घटक भारतातच तयार झाले पाहिजेत. ड्रोनची संरचना (मोल्ड), सॉफ्टवेअर, इंजिन आणि बॅटरी — सर्व काही स्वदेशी असणे गरजेचे आहे. हे काम सोपे नसल्याचे त्यांनी मान्य केले. सध्या अनेक देश ड्रोनसाठी आवश्यक घटक चीनकडून आयात करतात; मात्र भारताच्या सुरक्षेसाठी आणि सामरिक बळकटीसाठी ड्रोन निर्मितीत पूर्ण आत्मनिर्भरता अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजनाथ सिंह यांनी ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. या तंत्रज्ञानामुळे जगभरातील उत्पादन पद्धतीत मोठे बदल होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारचे उद्दिष्ट २०३० पर्यंत भारताला स्वदेशी ड्रोन निर्मितीचे जागतिक केंद्र (ग्लोबल हब) बनवण्याचे असल्याचे त्यांनी जाहीर केले. या मिशनसाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य आणि मदत दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode