
रायगड, 19 मार्च, (हिं.स.)। सोशल मीडियावरील ओळख किती धोकादायक ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार कर्जतमध्ये उघडकीस आला आहे. फेसबुकवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिघा आरोपींनी तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडून तब्बल ५ लाख ५१ हजार ४३६ रुपयांची खंडणी उकळल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गुंडगे (कर्जत) येथील बिकानेर स्वीट्स अॅण्ड नमकीन दुकानाजवळ फिर्यादीला बोलावण्यात आले. फेसबुकवरून ओळख झालेल्या आरोपींनी विश्वास संपादन करून त्याला भेटीसाठी पाचारण केले होते.
फिर्यादी घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्याला जबरदस्तीने त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या ह्युंडाई आय-टेन (एमएम ०२ डीएस १४५२) कारमध्ये बसवून अपहरण केले. त्यानंतर वावंढळ येथील माळरानावर नेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या मनात भीती निर्माण करण्यात आली.
या भीतीचा फायदा घेत आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याची सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. इतकेच नव्हे, तर आरोपींनी फिर्यादीकडून बँक खात्याची माहिती मिळवून डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आणखी ३ लाख ६५ हजार ४३६ रुपये काढून घेतले.
या घटनेत फिर्यादीचे एकूण ५ लाख ५१ हजार ४३६ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३५/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नवले करीत आहेत.
दरम्यान, अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर संपर्क ठेवताना सावधगिरी बाळगावी, तसेच प्रत्यक्ष भेटीपूर्वी योग्य पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)