“संघाचा चांगुलपणा कम्युनिस्टांनाही मान्य”- सरसंघचालक
‘जेन झी’ची देखील संघविचारांशी नाळ जुळते नागपूर, 19 मार्च (हिं.स.) : स्वतःला संघाचे विरोधक म्हणवणारे आणि कम्युनिस्ट देखील संघ चांगला असल्याचे म्हणतात असा दावा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला. नागपूरच्या सुरेश भट सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात
डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक (संग्रहित छायाचित्र)


‘जेन झी’ची देखील संघविचारांशी नाळ जुळते

नागपूर, 19 मार्च (हिं.स.) : स्वतःला संघाचे विरोधक म्हणवणारे आणि कम्युनिस्ट देखील संघ चांगला असल्याचे म्हणतात असा दावा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला. नागपूरच्या सुरेश भट सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ.विलास डांगरे उपस्थित होते.

याप्रसंगी आयोजित प्रगट मुलाखतीत संवाद साधताना सरसंघचालक म्हणाले की, परस्पर प्रेम, जिव्हाळा यातून संघ आणि संघकार्य वाढले. जोपर्यंत दोन माणसे एकमेकांना भेटतात तोपर्यंत संघ बंद होणार नाही. आता विरोधक आणि कम्युनिस्ट देखील संघाचा चांगुलपणा मान्य करतात.

अनुकूलता हे एक मोठे आव्हानच असते व पतनाची सुरुवात अनुकूलतेतूनच होते. अजून संघाचा स्वयंसेवक प्रसिद्धी अनुरूप झाला असे नाही. तो होऊ नये याचे प्रयत्नदेखील सुरू झाले आहेत. अनुकूलतेत कसे काम करावे हा विषय बौद्धिक वर्गात असतो. स्वयंसेवकांना अनुकुलतेची बाधा होऊ नये यावर विचार सुरू असतो व तसे प्रयत्न दिसून येतात, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

गेल्या 100 वर्षांच्या कार्यकाळात संघाचे काम मोठे झाले आहे. त्यामुळे रचना विकेंद्रित होणे आवश्यक झाले. अनेकदा कामादरम्यान शासन-प्रशासनाशी संबंध येतो. त्यासाठी वेगळी व्यवस्था हवी या विचारातून प्रांताऐवजी आता विभागाची रचना तयार करण्यात आली आहे. लोकांशी मैत्री करायची व आपल्या उदाहरणातून परिवर्तन घडवायचे हीच संघाची कार्यपद्धती आहे. रूप काळानुरूप बदलत असले तरी कार्यपद्धती तीच आहे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

संघाचा सुरुवातीचा काळ वेगळा होता व आव्हाने वेगळी होती. तेव्हा विभाजनाच्या काळात हिंदू विरोधात दंगली होत होती तेव्हा त्यामुळे संघाचे कार्य तसे (हिंदूंच्या रक्षणाचे) होते. आता काळ बदलला आहे आव्हान बदलली आहे त्यामुळे आमचे कार्यही बदलत आहे. आमचे विरोधक व काही कम्युनिस्ट बोलताना संघाचे आम्ही विरोधक आहोत असे म्हणतात. मात्र संघ चांगला आहे असेही ते म्हणतात, असेदेखील भागवत म्हणाले.

अनेकदा वक्तव्यांचा विपर्यास होतो. मात्र त्याचे मला फारसे काही वाटत नाही. उलट मला दया येते व हसू येते. संघाविरोधात बोलायला आता लोकांकडे फारसे काही नाही. मात्र काही तरी बोलायला हवे म्हणून असे प्रकार करतात. अशा घटनांतून आपलेदेखील शिक्षण होते. विशेष म्हणजे काय बोललल्यावर लोक काय अर्थ काढू शकतात हे समजते, असे प.पू.सरसंघचालक म्हणाले.

संघाच्या कार्याबाबत ‘जेन-झी’ अनुकूल

‘जेन-झी’ असे संबोधित करण्यात येत असलेल्या पिढीमध्ये देशाला मोठे करायचे आहे व आपली परंपरा आणखी समोर न्यायची आहे असा विचार दिसून येतो. त्यांना प्रामाणिकता व सेवेचे आकर्षण आहे. त्यामुळेच त्यांची संघविचारांशी नाळ जुळत असून ते संघकार्याबाबत अनुकूल आहेत. प्रत्यक्ष शाखेत येण्यास परिस्थितीनुरूप काही अडचणी असल्या तरी ते संघकार्यात जुळू इच्छितात. त्या पद्धतीची व्यवस्थादेखील संघाकडून करण्यात येत आहे. हायराईज इमारती, सोसायटींमध्ये तरुणांशी संपर्क साधण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी सरसंघचालकांनी दिली.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande