
आगामी 20 मार्चपासून देशव्यापी निधी संकलन मोहिम
नागपूर, 19 मार्च (हिं.स.) : स्वदेशी जागरण मंचतर्फे (एसजेएम) “स्वावलंबी भारत अभियान” राबविण्यासाठी 10 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीत देशव्यापी निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. स्वदेशी संकल्पनेचा प्रसार, स्थानिक उद्योग (एमएसएमई) बळकट करणे आणि रोजगारनिर्मितीस चालना देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे एसजेएमतर्फे सांगण्यात आले.
या अभियानासाठी आवश्यक आर्थिक व्यवहार पार पाडण्यासाठी “स्वर्णीम भारत फाऊंडेशन”ची स्थापना करण्यात आली असून निधी संकलन त्यामार्फत करण्यात येणार आहे. यासाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांना किमान १०० रुपयांपासून पुढे इच्छेनुसार योगदान देता येणार आहे.“व्होकल फॉर लोकल” या संकल्पनेला प्रोत्साहन देत स्थानिक कारागीर, लघु व सूक्ष्म उद्योगांना बळकटी देण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. तसेच स्वदेशी जागरण मंचाच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी, लघुउद्योगांना प्रशिक्षण आणि आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीसाठीही निधीचा उपयोग होणार आहे.
याशिवाय, एमवायएसबीए या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून तरुणांना नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. ग्रामीण भागात जाऊन स्वदेशी स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.या उपक्रमासाठी स्वदेशी जागरण मंचाने पगारी पूर्णवेळ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यकर्ते दोन ते तीन वर्षे काम करणार असून त्यांना दरमहा सुमारे 10 ते 15 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणाऱ्या या अभियानासाठी आवश्यक निधी उभारण्याच्या उद्देशाने ही देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे मंचाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी