नातीच्या वाढदिवसाला गेले आणि घर फोडले; श्रीवर्धनमध्ये लाखोंची चोरी
रायगड, 19 मार्च (हिं.स.)। घर बंद करून आनंदाच्या क्षणासाठी मुंबईला गेलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची घटना श्रीवर्धनमध्ये घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून तब्बल १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वाताव
नातीच्या वाढदिवसाला गेले आणि घर फोडले; श्रीवर्धनमध्ये लाखोंची चोरी


रायगड, 19 मार्च (हिं.स.)। घर बंद करून आनंदाच्या क्षणासाठी मुंबईला गेलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची घटना श्रीवर्धनमध्ये घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून तब्बल १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल आळी येथील रहिवासी फिर्यादी हे आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त मुंबईला गेले होते. दिनांक १२ मार्च दुपारी २ पासुन घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १,०५,००० रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली.

या घटनेमुळे परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. बंद घरांवर चोरट्यांची नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

नागरिकांनी घर सोडताना योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवावी, तसेच शेजाऱ्यांना माहिती देऊन सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande