
बोरगाव, 19 मार्च, (हिं.स.)। कोरो इंडिया यांच्या पुढाकाराने तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने आयोजित एकदिवसीय महिला कबड्डी स्पर्धा नाशिक येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सुरगाणा तालुक्यातील आदर्श युवा मंडळाच्या “आदर्श संघाने” उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. त्यामुळे आदिवासी भागातील महिलांचा क्रीडा क्षेत्रातील वाढता प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला.
या स्पर्धेचे उद्घाटन कोरो इंडिया संस्थेच्या पल्लवीताई पालव, मुमताजताई शेख, सुजाताताई लवाडे, सुप्रियाताई जाण आणि अमिताताई जाधव यांच्या उपस्थितीत झाले. ग्रामीण भागातील शेतकरी महिलांमध्ये संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच ग्रामीण व शहरी भागातील अनेक महिला संघांनी सहभाग घेतला. सर्व संघांनी अत्यंत चुरशीचे सामने खेळत स्पर्धेला रंगत आणली.
सुरगाणा तालुक्यातील आदर्श युवा मंडळाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. संघाचे नेतृत्व कर्णधार सोनाली झिरवाळ यांनी केले. संघातील खेळाडू जिजाताई महाले, बेबी पाडवी, प्रमिला गायकवाड, प्रमिला महाले, कुसुम सुरकार, जयश्री गावित, हिरा गावित, सिता गावित आणि चित्रा थोरात यांनी उल्लेखनीय खेळ करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक महिला आपल्या घरातील शेतीची कामे, कुटुंबाची जबाबदारी आणि संसाराचा गाडा सांभाळत क्रीडा क्षेत्रातही आपली क्षमता सिद्ध करत आहेत. दिवसभर शेतातील कामे करूनही त्यांनी स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले, ही बाब सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना क्रीडा क्षेत्रात अधिक संधी मिळाव्यात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV