
अयोध्या, 19 मार्च (हिं.स.)।राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी रामनगरी अयोध्या येथे राम मंदिराच्या उभारणीशी संबंधित काही निवडक शिल्पकार (कर्मयोगी) यांचा सन्मान केल्यानंतर उपस्थित रामभक्तांना संबोधित केले. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांच्या आमंत्रणावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दीड वर्षांच्या अंतरानंतर दुसऱ्यांदा अयोध्येला भेट देत राम मंदिरात श्रीराम यंत्राची स्थापना केली.या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, प्रभू श्रीरामांना वंदन करणे आणि भारतमातेचे पूजन करणे हे आपल्यासाठी समान आहे.
कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, आज अयोध्येत उपस्थित राहणे हा माझ्या जीवनाला कृतार्थ करणारा क्षण आहे. येथे येऊन मला अत्यंत अभिमान वाटत आहे. राम मंदिर आपल्याला आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी जोडते.त्या पुढे म्हणाल्या की, ५०० वर्षांच्या संघर्षानंतर आपल्याला हा सौभाग्याचा क्षण प्राप्त झाला आहे. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिरावरील ध्वजारोहण या आपल्या इतिहासातील सुवर्ण तिथी आहेत. मला श्रीराम यंत्र स्थापनेची संधी मिळाली, हे प्रभू श्रीरामांची माझ्यावर असलेली कृपा असल्याचे मी मानते.प्रभू श्रीरामांना वंदन करणे आणि भारतमातेचे पूजन करणे हे एकच आहे. आजच्या या पवित्र प्रसंगी आपण सर्वांनी भारतमातेचा सन्मान आणि वैभव सर्वोच्च शिखरावर नेण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
राष्ट्रपती यांनी पुढे सांगितले की, आपल्या देशाचा पुनर्जागरण आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये होत आहे. देवभक्ती आणि देशभक्ती यांचा मार्ग एकच आहे. देशातील सर्व नागरिकांनी ‘घटाघटात वास करणाऱ्या राम’ या पवित्र भक्तिभावाने एकात्म होऊन पुढे जावे, अशी माझी इच्छा आहे. रामराज्याच्या आदर्शांवर चालत आपण नैतिकता आणि धर्माचरणावर आधारित राष्ट्र उभारू शकतो. आपण सर्वजण समावेशक समाज आणि विकसित राष्ट्र घडविण्याच्या दिशेने पुढे जात आहोत. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने वर्ष २०४७ किंवा कदाचित त्यापूर्वीच आपण ही उद्दिष्टे साध्य करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode