
नवी दिल्ली, 19 मार्च (हिं.स.)सर्वोच्च न्यायालयाने यूट्यूबर एल्व्हिश यादवला सर्पदंश प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याच्याविरुद्धची फौजदारी कारवाई पूर्णपणे रद्द केली आहे. प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एलविश यादववर नोव्हेंबर २०२३ मध्ये नोएडा येथील एका रेव्ह पार्टीत सर्पदंश वापरल्याचा आरोप होता. याच आधारावर त्याला १७ मार्च २०२४ रोजी अटक करण्यात आली होती.
न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने आरोपपत्र आणि सुरू असलेल्या फौजदारी कार्यवाहीला आव्हान देणाऱ्या एल्व्हिशच्या याचिकेवर सुनावणी घेतली. तक्रार आणि एफआयआर कायदेशीररित्या टिकण्यायोग्य नाहीत, असा निकाल खंडपीठाने दिला. न्यायालयाने स्पष्ट केले, तक्रार आणि एफआयआर कायद्यानुसार टिकण्यायोग्य नाहीत. आम्ही इतर कोणत्याही मुद्द्यांवर विचार करणार नाही. ही कार्यवाही रद्द करण्यात येत आहे.
गेल्या महिन्याच्या सुनावणी दरम्यान, न्यायालयाने एल्व्हिशला कडक ताकीद दिली. खंडपीठाने म्हटले की, सेलिब्रिटींना सापांसारख्या 'मुक्या' प्राण्यांचा वापर करण्याची परवानगी देणे हा समाजाला एक नकारात्मक संदेश देतो. न्यायालयाने प्रश्न विचारला की, कोणी प्राणीसंग्रहालयात जाऊन प्राण्यांसोबत खेळू शकेल का? तो गुन्हा ठरणार नाही का?
एल्व्हिशच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, गायक फाझिलपुरियाच्या व्हिडिओमध्ये दिसलेल्या पार्टीला तो पाहुणा म्हणून उपस्थित होता. तिथे रेव्ह पार्टी किंवा अमली पदार्थांच्या वापराचा कोणताही ठोस पुरावा आढळला नाही. शिवाय, तपासलेल्या नऊ सापांपैकी एकाही सापात विषग्रंथी आढळली नाही. सरकारने दावा केला की, पोलिसांनी पाच कोब्रांसह नऊ सापांची सुटका केली आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये विषाचा वापर होत असल्याचे संकेत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे