लिओनेल मेस्सीचे रोनाल्डोला मागे टाकत सर्वात जलद ९०० करिअर गोल
नवी दिल्ली, 19 मार्च (हिं.स.) महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्याने अधिकृत सामन्यांमध्ये ९०० गोल पूर्ण केले असून, अशी कामगिरी करणारा तो ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर जगातील दुसरा पुरुष फुटबॉलपटू ठरला आ
लिओनेल मेस्सी


नवी दिल्ली, 19 मार्च (हिं.स.) महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्याने अधिकृत सामन्यांमध्ये ९०० गोल पूर्ण केले असून, अशी कामगिरी करणारा तो ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर जगातील दुसरा पुरुष फुटबॉलपटू ठरला आहे. कॉनकाकॅफ चॅम्पियन्स कपमध्ये नॅशविलविरुद्ध इंटर मियामीकडून खेळताना त्याने हा टप्पा गाठला.

या कामगिरीमुळे मेस्सी आता त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या रोनाल्डोच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. रोनाल्डो सप्टेंबर २०२४ मध्ये ९०० गोलचा टप्पा गाठला होता. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फुटबॉल हिस्ट्री अँड स्टॅटिस्टिक्स (IFFHS) नुसार, रोनाल्डो सध्या ९६५ गोलांसह १००० गोलच्या जादुई टप्प्याच्या जवळ पोहोचला आहे. पण, मेस्सीने सर्वात जलद ९०० गोल करून रोनाल्डोला मागे टाकले. मेस्सीने ही कामगिरी ११४२ सामन्यांमध्ये केली, तर रोनाल्डोला हा टप्पा गाठण्यासाठी १२३६ सामने लागले.

मेस्सीचा गोल त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात अयशस्वी ठरला. इंटर मियामी आणि नॅशविल यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. पण अवे गोलच्या नियमामुळे इंटर मियामी स्पर्धेतून बाहेर पडला. नॅशविलच्या एका फुटबॉलपटूने मेस्सीचा गोल परतवून लावत सामन्याचे चित्र पालटले आणि मेस्सीच्या ऐतिहासिक कामगिरीनंतरही संघाला पुढे जाण्यापासून रोखले.

मेस्सीने आपल्या शानदार कारकिर्दीत स्पॅनिश क्लब बार्सिलोनासाठी सर्वाधिक गोल केले. त्याने ७७८ सामन्यांमध्ये ६७२ गोल करून एकाच क्लबसाठी आपले असाधारण योगदान दाखवून दिले. त्यानंतर त्याने पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) साठी ७५ सामन्यांमध्ये ३२ गोल केले आणि आता तो इंटर मियामीसाठी ८१ गोल करून एक सातत्यपूर्ण गोल करणारा फुटबॉलपटू आहे. मेस्सीने आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने अर्जेंटिनासाठी ११५ गोल केले आहेत आणि संघाच्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मेस्सीच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी वर्ष २०१२ होते, जेव्हा त्याने क्लब आणि देशासाठी मिळून ९१ गोल केले. हा विक्रम आजही फुटबॉलच्या इतिहासातील एक मोठी कामगिरी मानला जातो. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले हे सर्वकालीन सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर सध्याच्या फुटबॉलपटूंमध्ये रॉबर्ट लेवांडोस्की त्यांच्या अगदी जवळ आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande