
मुंबई, 19 मार्च (हिं.स.)भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण पहायला मिळाली. जागतिक पातळीवरील कमकुवत संकेत आणि मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे बाजारात मोठी घसरण झाली. गेल्या तीन सत्रांपासून सुरू असलेली सुधारणा पूर्णपणे नाहीशी झाली. सेन्सेक्स जवळपास २४९६ अंकांनी, म्हणजेच ३.२६ टक्क्यांनी घसरून ७४,२०७.२४ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. निफ्टी ५० मध्येही ७७५.६५ अंकांची मोठी घसरण नोंदवली गेली आणि तो २३,००२.१५ वर बंद झाला.
१९ मार्च रोजी सकाळी बाजार उघडताच विक्रीची लाट सुरू झाली. सकाळी ९:१६ पर्यंत, सेन्सेक्स १,५८४.४३ अंकांनी (२.०७%) घसरून ७५,११९.७० वर पोहोचला होता. दरम्यान, निफ्टी ५००.४५ अंकांनी (२.१०%) घसरून २३,२७७.३५ वर व्यवहार करत आहे. बाजाराच्या पूर्व-सुरुवातीच्या सत्रात परिस्थिती आणखी बिकट होती, जिथे सेन्सेक्स २,२०० अंकांनी आणि निफ्टी ५८० अंकांनी घसरला होता.
बाजारात सर्वच क्षेत्रांमध्ये घसरण दिसली आहे. रिअल्टी, खाजगी बँका, ऑटो, वित्तीय सेवा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ग्राहक टिकाऊ वस्तू, सेवा, संरक्षण आणि धातू यासह सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले होते. लार्ज-कॅप स्टॉक्ससोबतच, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्येही घसरण दिसून येत आहे. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक १,१९४.४० अंकांनी, म्हणजेच २.१२ टक्क्यांनी घसरून ५५,०९५.४५ वर आला, आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक २४६.५० अंकांनी, म्हणजेच १.५२ टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २८ स्टॉक्स घसरले होते. एचडीएफसी बँक, एल अँड टी, ॲक्सिस बँक, एम अँड एम, ट्रेंट, इटरनल, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह आणि इंडिगो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. केवळ एनटीपीसी आणि पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. या बाजारातील घसरणीत बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सना सर्वात मोठा फटका बसला. एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्स, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), ॲक्सिस बँक आणि इंडिगो यांसारख्या प्रमुख शेअर्समध्ये ४% पर्यंत घसरण झाली. निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स ३% पेक्षा जास्त घसरला, तर ऑटो, वित्तीय सेवा आणि रिअल्टी निर्देशांकांमध्येही २% पेक्षा जास्त घसरण झाली.
बाजारातील या गोंधळामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेले युद्ध. आता हे युद्ध कमी होण्याऐवजी अधिकच चिघळले आहे. मध्य पूर्वेतील ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांच्या वृत्तांमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये घबराट पसरली आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे. इराणने जगातील सर्वात मोठ्या एलएनजी केंद्रांपैकी एक असलेल्या कतारच्या रास लाफान गॅस सुविधेवर क्षेपणास्त्र हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून, अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्र आणि तेल सुविधांना लक्ष्य केले. या युद्धामुळे जगभरातील पुरवठा साखळ्या आणि ऊर्जा बाजारपेठा धोक्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे